वाळूमाफियांच्या टेहळणीला तहसीलदारांने वेषांतर करून दिला चकवा; दोन ट्रॅक्‍टर केले जप्‍त !

सचिन पाटील 
Wednesday, 21 October 2020

कार्यालयाकडे जाण्याऐवजी वेगळ्या दिशेने अधिकाऱ्यांची वाहने वळताच एकमेकांना संपर्क साधून ती सावधगिरीच्या सूचना देतात.

 शिरपूर : तहसीलदार बाहेर पडले रे पडले की फोनाफोनी करून साथीदारांना सूचित करायचे आणि पुढील कारवाईपासून बचाव साधायचा, अशी कार्यपद्धती असलेल्या वाळूमाफियांच्या टेहळणी पथकाला तहसीलदार आबा महाजन यांनी चकवा दिला. बुधवारी (ता. २१) सकाळी कळमसरे (ता. शिरपूर) येथे अरुणावती नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने जप्त केले.

 
महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी शहरात वाळू माफियांनी खास माणसे नेमली आहेत. कार्यालयाकडे जाण्याऐवजी वेगळ्या दिशेने अधिकाऱ्यांची वाहने वळताच एकमेकांना संपर्क साधून ती सावधगिरीच्या सूचना देतात. त्यामुळे कारवाईपूर्वीच वाहने मुद्देमालासकट गायब होतात. मात्र, तहसीलदारांनी बुधवारी त्यांची तयारी मोडीत काढली. मजुराचा वेश धारण करून ते बाहेर पडले.

अशी केली कारवाई

मंडलाधिकारी व तलाठ्यांना सोबत घेऊन त्यांनी थेट कळमसरे गाव गाठले. तेथील पुलाखाली अरुणावती नदीपात्रात वाळू भरणे सुरू असताना, महसूल विभागाचे पथक जाऊन धडकले. या कारवाईत दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आली. विजय भालचंद्र चौधरी व विजय विठ्ठल पाटील यांच्या मालकीची ही ट्रॅक्टर असून, त्यांचा पंचनामा करण्यात आला. तहसीलदार आबा महाजन यांच्यासह मंडलाधिकारी संजय जगताप, प्रशांत ढोले, प्रभाकर गावित, प्रवीण मराठे, तलाठी अमृत राजपूत, वाहनचालक सतीश पाटोळे यांनी ही कारवाई केली

 

संपादन- भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Shirpur Tehsildar takes action against illegal sand dredgers