esakal | दोघांना वाचविण्यासाठी त्‍याने थेट मारली डोहात उडी पण
sakal

बोलून बातमी शोधा

storage sank in the dam

डोहातील खोल पाणी असलेल्‍या ठिकाणी दोन जण गटांगळ्या खात असल्‍याचे बकऱ्या चारणाऱ्याला निदर्शनास आले. कसलाही विचार न करता त्‍याने थेट उडी मारली. बुडणाऱ्यांमधील एकाचे केस पकडून बाहेर काढण्यात यश आले. मात्र दुसऱ्याला वाचविण्यासाठी उडी मारली; पण त्‍यात यश मिळाले नाही.

दोघांना वाचविण्यासाठी त्‍याने थेट मारली डोहात उडी पण

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : आंघोळीसाठी गेलेले दोन युवक साठवण बंधाऱ्यात बुडाले. जवळच बकऱ्या चारणाऱ्या एकाने त्यांना वाचवण्यासाठी डोहात उडी घेतली. एकाला वाचविण्यात यश आले. दुसऱ्याचा शोध लागू शकला नाही. दोन्ही युवक एकमेकांचे आतेभाऊ-मामेभाऊ आहेत. 

शिरपूर शहराजवळ आमोदे येथील अरुणावती नदीवरील बंधाऱ्यात आज (ता.४) सकाळी साडेदहाला ही घटना घडली. गरताड (ता.शिरपूर) येथील अजय देविदास भिल (१७) व त्याचा आतेभाऊ सोमनाथ भिल (१८) आंघोळ करण्यासाठी बंधाऱ्यालगत नदीपात्रात उतरले. प्रवाहाचा व खोलीचा अंदाज न आल्याने दोघे काही वेळातच गटांगळ्या खाऊ लागले. नदीकाठावर गवतात बकऱ्या चारणाऱ्या गुलाब भिल (रा.आमोदे) याने दोघांना बुडतांना पाहून जिवाची पर्वा न करता डोहात उडी घेतली. बुडणाऱ्या सोमनाथचे केस गच्च पकडून बाहेर खेचण्यात त्याला यश आले. त्याला काठावर पोहचवून पुन्हा डोहाकडे परतला तोपर्यंत अजय भिल बेपत्ता झाल्याचे आढळले. शोधाशोध करूनही त्याचा तपास लागू शकला नाही. याबाबत शिरपूर टेक्सटाईल पार्कचे चेअरमन तपन पटेल यांना माहिती मिळताच त्यांनी पट्टीच्या पोहणाऱ्याचे पथक घटनास्थळी रवाना केले. 

डोह, कपारीमुळे झाला घात
माजी शिक्षणमंत्री अमरिषभाई पटेल यांच्या जनक व्हिला या निवसस्थानापासून सुमारे एक किमी अंतरावर हा बंधारा आहे. अरुणावती नदीचा वेगवान प्रवाह बंधाऱ्यावरून खाली कोसळत असल्याने डोह आणि कपारी तयार झाल्या आहेत. दरवर्षी तेथे अशा स्वरूपाच्या घटना घडतात. प्रशासनातर्फे खबरदारी घेण्याबाबत फलक लावूनही त्याकडे दुर्लक्ष करून अविचाराने धाडस करणाऱ्या युवकांचे मृत्यू तेथील डोहात घडले आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image