esakal | चोरीच्या गाड्यांची स्पेअर पार्ट्सची वाहतूकीचे तीन ट्रक जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

police action

दोन वर्षात धुळे, मालेगाव, नंदुरबार, नाशिक व जळगाव येथे चोरीस गेलेल्या वाहनांचे सुटे भाग काढून त्यांची विक्री करण्यासाठी वाहतूक केल्याच्या संशयावरून संशयित राजूलाल सेन (२२, रा.मालिपुरा ता.बेहगुण जि.चित्तोडगढ, राजस्थान), रईसखान हनीफखान (३२, रा.पारोळा रोड, धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

चोरीच्या गाड्यांची स्पेअर पार्ट्सची वाहतूकीचे तीन ट्रक जप्त 

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर स्पेअर पार्ट्सची वाहतूक करणारे तीन ट्रक शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील मालाबाबत संबंधित कोणतीच कागदपत्रे सादर न करू शकल्याने हा मुद्देमाल चोरीचा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या कारवाईत सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून तीन जणांना अटक करण्यात आली. 

महामार्गावर स्पेअर पार्ट्सची संशयास्पद वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. तीन सप्टेंबरला रात्री शिरपूर टोल नाक्यावर संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू असताना धुळ्याकडून शिरपूरकडे जा‍णाऱ्या दोन ट्रक्स (आरजे ०९ जीए ५४८५ व एमएच ०४ एफजे ७८७४) मध्ये डिस्क, डिझेल पंप, अ‍ॅक्सल्स, नट, बोल्ट व अन्य वाहनांचे सुटे भाग आढळले. पोलिसांनी संशयावरून ट्रक व मुद्देमाल ताब्यात घेतला. हा माल पाठविणारे, स्वीकारणारे व वाहतूक करणारे अशा तिघांपैकी कोणीही मुद्देमालाशी संबंधित मूळ कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे हा मुद्देमाल चोरीचा असल्याची शंका बळावली. गेल्या दोन वर्षात धुळे, मालेगाव, नंदुरबार, नाशिक व जळगाव येथे चोरीस गेलेल्या वाहनांचे सुटे भाग काढून त्यांची विक्री करण्यासाठी वाहतूक केल्याच्या संशयावरून संशयित राजूलाल सेन (२२, रा.मालिपुरा ता.बेहगुण जि.चित्तोडगढ, राजस्थान), रईसखान हनीफखान (३२, रा.पारोळा रोड, धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 

वाहनांचे सुटे पार्ट
शहर पोलिसांनी दुसरी कारवाई सात सप्टेंबरला केली. रात्री साडेअकराला संशयित ट्रक (एमएच १८ एम २५४५) ची झडती घेतल्यावर तिच्यात चार लाख रुपये किमतीचे वाहनांचे सुटे भाग व भंगार आढळले. पोलिसांनी दिलेल्या मुदतीत मुद्देमालाशी संबंधित मूळ कागदपत्रे सादर न केल्याने संशयित चालक फिरोजखान अहमदखान (३६, रा.वडजाई रोड, गफूर गेटजवळ, धुळे) याला अटक करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत दहा लाख रुपये आहे. शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्रात वाहनचोरी करून सुटे भाग काढून घेत परप्रांतात विक्री करणारी आंतरराज्यीय गुन्हेगारांची टोळी हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे