नाशिकमध्ये मतदारांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

residentional photo
residentional photo

नाशिकः जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. विद्यमान आमदार अनिल कदम (निफाड), राजाभाऊ वाजे (सिन्नर), योगेश घोलप (देवळाली) या तीन विद्यमान आमदारांसह कॉंग्रेसमधून शिवसेनेने आयात केलेल्या निर्मला गावित अशा चार विद्यमान आमदारांना मतदारांनीच जय महाराष्ट्र केला. नगरसेवकांच्या जोरावर पश्‍चिम मतदारसंघाच्या जागेसाठी युतीत आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला लोकसभा मतदारसंघात स्वतःच्या हक्काच्या जागा राखता आल्या नाहीत. 

मंत्री दादा भुसे हेच एकमेव विद्यमान आमदार निवडून आले, तर नांदगावमधून सुहास कांदे यांच्या रूपाने एक जागा मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील पराभवाचे खापर कुणावर फुटणार, याकडे लक्ष लागून आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय शिवसेनेच्या यशापयशाचे विश्‍लेषण केले तर नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना भुईसपाट झाली. नाशिक पश्‍चिम मतदारसंघात मित्रपक्ष भाजपला अपशकुन करण्यात व्यस्त असलेल्या शिवसेनेला दिंडोरी मतदारसंघात सुहास कांदे, तर धुळे मतदारसंघात दादा भुसे यांच्या रूपाने एकेक जागा राखण्यात शिवसेनेला यश आले. पक्षीय पातळीवर संघटनेला हा मोठा दणका आहे. देवळालीत शिवसेनेची अर्थात घोलपांची तब्बल 35 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. निफाडला अनिल कदम यांची हॅट्ट्रिक हुकली. राजाभाऊ वाजे यांना निसटता पराभव पत्करावा लागला. पश्‍चिम मतदारसंघात शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन विलास शिंदे यांना उमेदवारी देत भाजपला अपशकुन केला खरा पण त्यात पहिल्या तीन फेऱ्यांनंतर शिवसेनेची चमक दिसली नाही. 

प्रचार दिसलाच नाही 
शिवसेनेचा विधानसभा निवडणुकीत कुठेही प्रभाव दिसला नाही. कुठे चौकसभा झाल्या नाहीत. पक्षाच्या नेत्यांच्या दौऱ्यांची शिवसेनेच्या कार्यालयात माहिती नसायची. मध्यवर्ती कार्यालयातून प्रचार नियोजन अशा कुठल्याही बाबतीत जिल्हा कार्यालयच अनभिज्ञ होते. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाची मुंबईतील प्रचारावर भिस्त होती. आदित्य ठाकरे यांचे दौऱ्यांचे मुंबईतूनच ठरायचे. इथे स्थानिक पातळीवर कुणाला माहितीच नसायची. जिल्हा, शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना प्रचाराचे काही पडलेच नव्हते. उमेदवारांवरच विजयाची जबाबदारी सोपविल्यानंतर शिवसेनेचे वरिष्ठ कुणीही फिरकले नाहीत. स्थानिकांनी प्रचारात रस घेतला नाही. केवळ धनुष्याचे चिन्ह दिले आणि संपले असेच स्वरूप दिसले. ज्यांना प्रचारात रस होता त्यांनी सोयीच्या मतदारसंघात स्वतःला झोकून दिले. या सगळ्याचा परिणाम शिवसेनेला नाशिकला भोगावे लागले. 

नाशिक पश्‍चिमचा डाव अंगलट 
नाशिक पश्‍चिम मतदारसंघात शिवसेनेचे अधिक नगरसेवक असल्याचे कारण दाखवीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी पश्‍चिम मतदारसंघात भाजपपुढे आव्हान निर्माण केले. 
शिवसेनेच्या नेतृत्वाने मूकसंमती दाखवीत पश्‍चिमच्या बंडखोरीसोबत पूर्वमधील विरोधी उमेदवारांना छुपी रसद पुरविण्याचा प्रयत्न केला. मात्र नाशिक पश्‍चिमची भाजपची तर जागा दूरच पण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेला स्वतःच्या वाट्याच्या सिन्नर, देवळाली, तर दिंडोरीतील निफाडच्या जागा राखता आल्या आहेत. इतर पक्षांतून आलेल्या निर्मला गावित यांना शिवसेनेत प्रवेश करून पराभवाचे धनी व्हावे लागले. पश्‍चिम मतदारसंघात शक्तीप्रदर्शनाचा जोर लावणाऱ्या शिवसेनेच्या स्वतःच्या जागा राखण्यासाठी मात्र जोर लावता आला नाही.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com