काय सांगताय...विलगीकरण कक्ष धूळ खात पडून! 

एल. बी. चौधरी
Monday, 8 June 2020

"कोरोना'शी लढणार? मग दुसरी शासकीय किंवा खासगी रुग्णवाहिका नसल्याने एखाद्या रुग्णाला धुळे किंवा अन्यत्र न्यायचे असल्यास कोणतीही योग्य व्यवस्था नाही, असे गंभीर चित्र आहे. 

सोनगीर ः धुळे तालुक्‍यातील एकमेव सोनगीरच्या ग्रामीण रुग्णालयात "कोरोना'च्या संकटकाळात योगदानासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. मात्र, तो धूळ खात पडून आहे. 30 खाटांच्या या रुग्णालयात अद्याप एकही रुग्ण "क्वारंटाइन' केला नाही. संशयित रुग्ण आल्यास त्याला घरी क्वारंटाइन होण्याचा सल्ला देणे किंवा सरळ धुळ्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठविणे यातच रुग्णालयाने धन्यता मानल्याचे दिसते. या रुग्णालयाच्या समस्या पाहता उपचारांऐवजी तेच "सलाईन'वर आहे की काय, असा प्रश्‍न पडावा. 

"कोरोना'च्या संकटकाळात एकीकडे धुळेस्थित हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयावर सर्वाधिक भार असतानाच सोनगीरच्या ग्रामीण रुग्णालयाचा जिल्हा सरकारी यंत्रणेसह जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने क्षमतेने वापर करून घेतला नसल्याचे म्हणावे लागेल. या रुग्णालयात "कोरोना'सदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचारही होत नाहीत. 

खरेच लढा देऊ शकू का? 
रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा आहे. तसेच 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला चालक आहेत. पण डॉक्‍टर नाहीत. त्यामुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात जाताना रुग्ण, नातेवाइकांना जीव मुठीत ठेवावा लागतो. रुग्णवाहिकेतील डॉक्‍टरांना वेळेवर व फारसा पगार मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी नोकरीच सोडली. अशा 11 रुग्णवाहिकांसाठी केवळ दोनच डॉक्‍टर आहेत. पैकी एखादा आजारी किंवा रजेवर गेला तर काय अवस्था होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. या स्थितीत आपण कसे "कोरोना'शी लढणार? मग दुसरी शासकीय किंवा खासगी रुग्णवाहिका नसल्याने एखाद्या रुग्णाला धुळे किंवा अन्यत्र न्यायचे असल्यास कोणतीही योग्य व्यवस्था नाही, असे गंभीर चित्र आहे. 

कर्मचारी मुक्कामी नाहीत 
रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, आयुष आयुर्वेदिक अधिकारी, क्ष किरण तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, सात अधिपरिचरिका, दोन कनिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, शिपाई, चार कक्षसेवक, दोन सफाई कामगार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, आयसीटीसी टेक्‍निशियन, "एचआयव्ही'वर समुपदेशक, आरोग्यमित्र, महालब्स, असे सरासरी 30 कर्मचारी कार्यरत आहेत. वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांची कमतरता आहे. अधीक्षक पदाचा डॉ. कल्पेश वाघ यांच्याकडे तात्पुरता पदभार आहे. ग्रामीण रुग्णालयात निवास व्यवस्था सोय असूनही वैद्यकीय अधिकारी व बहुतांश कर्मचारी धुळ्याहून ये- जा करतात. 

रुग्ण पाठविले धुळ्याला 
रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी टिकत नसल्याने तज्ज्ञ डॉक्‍टरांऐवजी बीएएमएस, बीएचएमएस व तत्सम पदवीधारक कार्यरत आहेत. बाहेरगावांहून आलेल्या हजाराहून अधिक व्यक्तींना घरीच क्वारंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला. दोन कोरोना पॉझिटिव्ह तपासणीला आले. मात्र, त्यांना ग्रामीण रुग्णालयात सुविधा नसल्याचे सांगत धुळ्याला पाठविण्यात आले. रुग्ण कल्याण समिती असून ग्रामीण रुग्णालयाला दुरुस्ती किंवा सामग्री, वीज बिल, रंगरंगोटीसाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव पाठविल्यानंतर तो मंजूर रकमेतून दिला जातो. 

तालुक्‍याची परवड 
धुळे तालुक्‍यात सरकारी रुग्णालयांची संख्या तोकडी आहे. एकही ट्रामा सेंटर नाही. एकच ग्रामीण रुग्णालय आहे. कार्यक्षेत्रात कुठेही अपघात झाला तर ग्रामीण रुग्णालय किंवा आरोग्य केंद्रे जखमींना सरळ धुळ्यातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठवितात. ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टर नेमला तर जखमींना दिलासा मिळू शकेल. "कोरोना'सह इतर काळात जनहितासाठी ग्रामीण रुग्णालय क्षमतेने उपयोगात येण्यासाठी आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींना तत्काळ पावले उचलावी लागतील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songeer corona Quarantine ward not working