कोरोनामुळे अधिक मासावर विरजन; तांबे, पितळ्याच्या भांड्यांची मागणी झाली कमी   

एल. बी. चौधरी
Monday, 28 September 2020

धोंडामध्ये सध्या अडीच ते तीन किलोचा गंगाळ, दोन किलोची घागर व एक किलोची कळशीला सर्वाधिक मागणी असून ब्राह्मणासाठी तांब्याचे तम्हाण, आरती, गडू, ग्लास, फुलपात्र अशी पाच भांडी द्यायची पद्धत आहे.

सोनगीर  : तीन वर्षांनंतर येणारा पुरुषोत्तम (अधिक) मास म्हणजे धोंडाचा महिना. जवाई किंवा भाच्याला भेटवस्तू देऊन सन्मानित करण्याचा महिना मानला जातो. या महिन्यात तांब्याची वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. त्यामुळे येथील भांडी बाजारात काहीसे समाधानाचे वातावरण असले, तरी कोरोनामुळे जावाई सासऱ्यांकडे जायला नाखूष आहेत. यामुळे भांड्यांना तुलनेने मागणी कमी असून, दर वाढले आहेत. येथील कारागीरांनी तयार केलेली तांबे- पितळाच्या भांड्यांना राज्यभरच नव्हे, तर परराज्यातही मागणी आहे. 

भांडी तयार करून विक्री करणे हा येथील तांबट, बांगडी व गुजराती कासार समाजाचा पिढ्यांना पिढ्यांपासून व्यवसाय असून, इतर समाजाने ही या व्यवसायात उडी घेतली आहे. सुमारे दोनशे कुटुंबे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या व्यवसायात असून, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. 

घागर, कळशीला मागणी 
सध्या तांब्याचे कच्चा मालाचा दर साडेपाचशे ते सहाशे रुपये किलो असून, मजुरीचा खर्चानुसार तयार वस्तू सातशे ते आठशे रुपये किलो विकले जाते. तयार भांड्यांना लग्नसराईत सर्वाधिक दिवाळी, दसराला बऱ्यापैकी मागणी असते. मात्र, यंदा कोरोना व लाॅकडाउनमुळे लग्नसराई वाया गेली. भांंडी कारागीरांना उदरनिर्वाह करणे अक्षरशः कठीण गेले. पावसाळ्याचे चार महिने कारागिरांना काम नसते. यंदा धोंडा आल्याने कारागीरांना यंदा प्रथमच तेही उदरनिर्वाहापुरतेे काम मिळाले, तरीही समाधानाचे वातावरण आहे. येथे प्रामुख्याने पातेले, परात, गंगाळ, घागर, गुंडा, कळशी, तपेली, बादली व मागणीप्रमाणे लहान- मोठी भांडी तयार करून दिली जातात. भांडी विक्री वर्षभर सुरू असते. धोंडामध्ये सध्या अडीच ते तीन किलोचा गंगाळ, दोन किलोची घागर व एक किलोची कळशीला सर्वाधिक मागणी असून ब्राह्मणासाठी तांब्याचे तम्हाण, आरती, गडू, ग्लास, फुलपात्र अशी पाच भांडी द्यायची पद्धत आहे. मात्र, फारशी मागणी नाही. 

धोंड्याचा महिन्यात तांब्याच्या वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. यंदा तुलनेने ३० टक्के व्यवसाय कमी आहे. तांब्याची वस्तू म्हणजे सोनगीर अशी ग्राहकांची खात्री असल्याने येथे खरेदीसाठी येतात. भांडी व्यवसायात सध्या समाधानाचे वातावरण आहे. अजून १५ ते २० दिवस अशी स्थिती राहील. 
-राजेंद्र बळीराम तांबट, भांड्यांचे व्यापारी, सोनगीर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songir corona proliferation on more fish led to less on the pot business