esakal | श्रमदानातून गावाने घडवली जलक्रांती; पाणी टंचाईवर देखील केली मात ! 
sakal

बोलून बातमी शोधा

श्रमदानातून गावाने घडवली जलक्रांती; पाणी टंचाईवर देखील केली मात ! 

दरवर्षी एप्रिल व मे मध्ये १५ ते २० दिवसानंतर मिळणारे पाणी गेल्यावर्षापासून चार दिवसाआड मिळते. अनेक वर्षांपासून निम्मे देखील न भरणारा तलाव ओवरफ्लो होत आहे.

श्रमदानातून गावाने घडवली जलक्रांती; पाणी टंचाईवर देखील केली मात ! 

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर ः पाणीटंचाईला नियमित तोंड देणाऱ्या ग्रामस्थांनी पाण्याचे महत्त्व जाणून येथील मूळ पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आज त्याचे दृश्य परिणाम दिसत असून येथील पाझर तलाव, गुळनदी ओसंडून वाहू लागले. वर्षभरापासून येथे पाणीटंचाई नाही. सहा वर्षांपासून पर्यावरणावर जीवापाड प्रेम करणाऱ्या काही ग्रामस्थ एकत्र येऊन हरित समिती सोनगीर स्थापन करून जणू एक नैसर्गिक क्रांतीच घडवून आणली. 

पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर व्हावी यासाठी येथील हरीत समितीच्या युवक, प्रौढ, तरुणी व महिलांनी कंबर कसली. आणि उभी राहिली एक अविस्मरणीय जलक्रांती. श्रमदानासाठी हजारो हात पुढे सरसावले. हरित समिती सदस्यांसोबत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पोलिस, शिक्षक आदींनी गटागटाने श्रमदान केले. गावाने पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत दोन वर्षे सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेऊन एक वेगळीच चेतना सहकाऱ्यांमध्ये निर्माण केली. 

अशी वाढली पाणी साठवण क्षमता
२०१७, २०१८ व त्यापूर्वीही लोक सहभागातून पाझर तलावाजवळील दोन डोंगरावर सीसीटी, चार माती बांध, चार दगडी बांध, पदरमोड करून यंत्राद्वारे एका डोंगरावर खोल सीसीटी, पाझर तलावात पाणी यावे म्हणून वीज ट्रान्समिशन कंपनीपासून सुमारे अडीच किलोमीटर चारी तसेच तलावाच्या उत्तरेकडील डोंगरातून तलावापर्यंत आठशे मीटर चारी, तीन किलोमीटर नाला रुंदीकरण व खोलीकरण, ट्रान्समिशन कंपनीजवळ सुमारे दोन दशलक्ष लीटर पाणी साठवण क्षमतेचा लहान तलाव खोलीकरण, डेरे शाळेजवळ डोंगराच्या पायथ्याशी बारी पर्यंत ६०० मीटर, गोल टेकडीच्या पायथ्याशी २०० मीटर, सुवर्णगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी ३०० मीटर खोलचारी, सुरकी नदीचे नाला खोलीकरण व रुंदीकरण, गुळ नदीपात्र एक किलो मीटर लांब, रुंदी ५० मीटर, खोली दीड ते दोन मीटर खोदले. सध्या नदीच्या बंधाऱ्यात सुमारे तीन दशलक्ष लीटर पाणी साठवण होते.

शोषखड्यातून पाणी जिरवले

सार्वजनिक विहिरीला लागून सुमारे ५००० लीटर क्षमतेचा शोषखड्डा आदी कामे सहभागातून झाली. परिणामी दरवर्षी एप्रिल व मे मध्ये १५ ते २० दिवसानंतर मिळणारे पाणी गेल्यावर्षापासून चार दिवसाआड मिळते. अनेक वर्षांपासून निम्मे देखील न भरणारा तलाव ओवरफ्लो होत आहे. विहिरी रिचार्ज झाल्या, बोर रिचार्ज झाले. गूळ नदी भरून वाहत आहे. गाव पाणीटंचाई मुक्त झाले आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे धुळे