धुळे जिल्ह्यातील 13 पैकी 11 प्रकल्प फुल्ल !

एल. बी. चौधरी 
Wednesday, 23 September 2020

यंदा दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. मात्र भविष्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून पाणी सोडू नये असे ग्रामस्थांना वाटते. यंदाच्या या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील.

सोनगीर : गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्याने धुळे जिल्ह्यातील तेरा पैकी अकरा धरण फुल्ल झाली असून जिल्ह्यातील सर्व लघु प्रकल्पदेखील भरले आहेत. सुलवाडे व अक्कलपाडा प्रकल्पात ५० टक्केपेक्षा कमी पाणी आहे. जिल्ह्यातील सर्व लघु व मध्यम प्रकल्पात सध्या ७५.८६ टक्के जलसाठा असून यंदा पाणी साठ्याची ही स्थिती चांगली असल्याने यंदा जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवणार नाही अशी स्थिती आहे. 

वाचा ः धुळे महापालिकेकडून हद्दवाढीतील मालमत्तांना नवी करआकारणी
 

धुळे जिल्ह्यात १२ मध्यम व ४७ लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमता ४९४. ८६ दशलक्ष घनमीटर पाणी एवढी आहे. सध्या त्यात ३७५.२५२ दशलक्ष घनमीटर एवढा जलसाठा आहे. लघु प्रकल्पाची जलसंचयन क्षमता १२१.९७ दशलक्षघनमीटर असून सध्या त्यात ११३.०२६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९२.६७ टक्के जलसाठा आहे. 

मध्यम प्रकल्पाची जलसंचयन क्षमता ३७२. ८९ दलघमी असून सध्या २६२.२२६ दलघमी म्हणजेच ७०.३२ टक्के जलसाठा आहे. धुळे जिल्ह्यातील १३ प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प पूर्ण भरले असून पांझरा, कनोली, मालनगाव, जामखेडी, बुराई, मुकटी प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. शिवाय करवंद, अनेर, वाडीशेवाडी, सोनवद, अमरावती हे ९५ टक्केपर्यंत भरले आहेत. पाऊस तसेच पाण्याचे स्रोत सुरूच असल्याने हे प्रकल्प या आठवड्यात शंभर टक्के भरतील. सुलवाडे प्रकल्पात अद्याप साठवण सुुरू केले जात नसल्याने तसेेच अक्कलपाडा धरणाचे केवळ ७० टक्के काम झाल्याने या दोन प्रकल्पात अनुक्रमे २१.६४ व ४४.१५ टक्के पाणी आहे अन्यथा ते ही भरले असते. परिसरातील जामफळ, सोनवद, देवभाने, सातपायरी धरण, सर्व तलाव, बांंधारे शंंभर टक्के भरले असून जामफळ धरणाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने संपादित नसलेल्या शेतात पाणी जाऊ नये म्हणून पाणी सोडण्यात आले आहे. यंदा दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. मात्र भविष्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून पाणी सोडू नये असे ग्रामस्थांना वाटते. यंदाच्या या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील. कोरोना, वादळाने त्रस्त जनतेला पाणी टंचाईने ग्रासले नाही हे भाग्यच म्हणावे लागेल. दरम्यान गेल्या २० वर्षात जामफळ व्यतिरिक्त एकाही लघुप्रकल्पाचा विस्तार केला गेला नाही. किमान अक्कलपाडा धरणाचा विस्तार आवश्यक आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songire All the dams in Dhule district are full, farmers are happy