धुळे महापालिकेकडून हद्दवाढीतील मालमत्तांना नवी करआकारणी 

निखील सुर्यवंशी
Wednesday, 23 September 2020

मालमत्तांना त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये लागू असलेल्या करानुसार महापालिका वसुली करत होती. दरम्यान, महापालिकेने या हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्तांचे नव्याने मोजपाम सुरू केली आहे.

धुळे  ः हद्दवाढीने महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या अकरा गावांतील मालमत्तांना नवीन कर आकारणीची प्रक्रिया अखेर महापालिकेने सुरू केली. मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू झाली. हद्दवाढ क्षेत्रात साधारण २० ते २२ हजार मालमत्ता असून, नव्याने कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्तांच्या कर आकारणी मुद्दा भाजपच्या नगरसेविका भारती माळी यांनीही स्थायी समिती सभेत उपस्थित केला होता. 

महापालिकेची ५ जानेवारी २०१८ ला हद्दवाढ झाली. यात वलवाडी, महिंदळे, बाळापूर, पिंप्री ही संपूर्ण गावठाणासह, भोकर, नकाणे, अवधान, चितोड, वरखेडी, मोराणे या सहा महसुली गावांचे गावठाणासह काही क्षेत्र व नगावचे गावठाणाशिवाय क्षेत्र धुळे महापालिका हद्दीत समाविष्ट झाले. संबंधित क्षेत्रातील मालमत्तांना त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये लागू असलेल्या करानुसार महापालिका वसुली करत होती. दरम्यान, महापालिकेने या हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्तांचे नव्याने मोजपाम सुरू केले, ही प्रक्रिया फेब्रुवारी-२०२० मध्ये पूर्ण झाल्याचे मालमत्ता कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

माळींनी उपस्थित केला मुद्दा 
हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्तांचे मोजमाप झाले. मात्र, संबंधित मालमत्ताधारकांना १२३ ची नोटीस का बजावण्यात आली नाही असा प्रश्न प्रभाग क्रमांक-२ (ब) च्या भाजपच्या नगरसेविका भारती माळी यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला होता. हद्दवाढ क्षेत्रातून दरवर्षी २०-२५ कोटी रुपये उत्पन्न येऊ शकते. अधिकाऱ्यांनी मात्र, संपूर्ण रेकॉर्ड का दाबून ठेवले, याची जबाबदारी कोण घेणार, दिरंगाईमुळे मनपाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. संबंधित मालमत्ताधारकांना त्वरित नोटीस बजावून बांधकाम परवानगी मिळाल्यापासून कर आकारणी करावी अशी मागणी केली होती. 
 

नोटिसा बजावणे सुरू 
हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्तांना कर आकारणीसाठी नोटिसा बजावणे सुरू झाले आहे. मोराणे, वरखेडी व अवधान येथील मालमत्ताधारकांना त्या-त्या भागातील कर्मचाऱ्यांमार्फत नोटिसा देण्यात येतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उर्वरित क्षेत्रातील प्रक्रीयाही सुरू आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांवर हरकती असल्यास कार्यवाही होईल. हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्तांना सी- झोनचे दर लावण्यात आले आहेत. 

काम कसे करायचे ? 
मालमत्ता कर वसुली विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यात स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त अभियान आदी कामांनाही वसुली विभागाचे कर्मचारी जुंपले जातात. आता कोरोनाचे संकट आल्यानंतही साधारण सर्वच कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या उपाययोजनांसाठी कामे लावली आहेत. त्यामुळे कर वसुलीसह आनुषंगिक कामे कशी करायचे असा प्रश्‍न अधिकाऱ्यांसमोर आहे. 
 

हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ता अशा 

- नगाव...........४५ 
- पिंप्री...........४७९ 
- भोकर..........७४० 
- नकाणे........१०५५ 
- बाळापूर......१०८६ 
- वरखेडी.......११४५ 
- चितोड........१२७४ 
- अवधान.......१३३० 
- मोराणे.........१४३० 
- महिंदळे........१७५० 
- वलवाडी....अंदाजे १२००० 

कर आकारणीचे दर असे (सी- झोनप्रमाणे) 
- आरसीसी बांधकाम.....१७ रुपये (प्रती स्क्वेअर मीटर) 
- लोड बेअरिंग............११ 
- पत्र्याचे....................०८ 
- झोपडपट्टी.................०६ 
- व्यावसायिक ः बांधकाम प्रकारानुसार दुप्पट 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Dhule Municipal Corporation started the process of tax collection for new taxpayers