esakal | पारंपारिक विवाह संस्था आल्या मोडकळीस !
sakal

बोलून बातमी शोधा

पारंपारिक विवाह संस्था आल्या मोडकळीस !

विवाह जुळविणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. लग्न जुळविल्यानंतर पती - पत्नीत बिनसले तर त्याचे खापर जुळविणाऱ्यावर फोडले जाते. म्हणूनही अनेक मध्यस्थांनी माघार घेतली आहे.

पारंपारिक विवाह संस्था आल्या मोडकळीस !

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर ः 'विवाह जुळणी करून देणे हा सामाजिक बांधिलकीचा प्रकार पडद्याआड गेले असून तो वार्षिक मोठी उलाढाल करणारा प्रकार झाला आहे. वधू वर परिचय मेळाव्यातून लाखोंची उलाढाल होत आहे. त्यामुळे विवाह खर्चात वाढ तर झालीच पण खरेच सुयोग्य जोडीदार मिळतो का हा प्रश्न आहे. संबंध विच्छेद होण्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहचले आहेत. 

वाचा- शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काढलेल्या दिंडीला आज ३९ वर्ष पूर्ण !
 

विवाह संस्थेस घरघर  
 पुर्वी प्रत्येक समाजात जेष्ठ आणि सहसा निवृत्त व्यक्तीला लग्नाची अनेक स्थळे माहिती असायची. व त्याला दोन हाताचे चार हात करण्यात आनंद व अभिमानही वाटे. वर व वधू दोन्हीकडे त्याला मान असे. असे विवाह जुळविणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. लग्न जुळविल्यानंतर पती - पत्नीत बिनसले तर त्याचे खापर जुळविणाऱ्यावर फोडले जाते. म्हणूनही अनेक मध्यस्थांनी माघार घेतली आहे. आणि त्याचाच फायदा लग्न जोडणाऱ्या व्यावसायिक संस्थांनी घेतली आहे. 

अविवाहित तरुणांची संख्या वाढली  
आजही मुलामुलींमध्ये भेद पाळले जात असल्याने गावोगावी अविवाहित युवकांची वाढती संख्या चिंतेची बाब बनली आहे. अशा युवकांना परजातीतील गरीब घरातील विशेषत: राज्याच्या सीमेवरील गावातील मुली मिळवून देणाऱ्या दलालांचा व्यवसाय फोफावला आहे. वधू मिळविण्यासाठी दीड लाख रूपये मोजावे लागत आहे. लग्नाच्या व्यवहारात काही प्रामाणिक तर काही बाबतीत फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. प्रत्येक समाजात विशेषत: उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या समाजात मुलींची संख्या कमी असून प्रत्येक गावात प्रत्येक समाजात सरासरी 35 युवक अविवाहीत आहेत. अनेक युवकांचे लग्नाचे वयही टळले आहे. नोकरदार वगळता लहान व्यावसायिक, कारागीर, मजूर, शेतकरी युवकांना वधू मिळणे कठीण झाले असून परिस्थिती गंभीर झाली आहे. 

विवाह संस्था बनल्या व्यावसायिक  
योग्य जोडीदार मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या अनेक विवाह जुळविणाऱ्या संस्था उदयास आल्या आहेत. सर्व माध्यमांमध्ये त्यांनी जाहिरातींचा पाऊस पाडला आहे. अव्वाच्या सव्वा शुल्क घेऊन लग्न जुळवून देण्याचा हा व्यवसाय भरभराटीस आला आहे. विविध समाजात देखील वधूवर परिचय मेळावा घेतला जातो. काळाची गरज असली तरी हे मेळावे व्यवसायाचा भाग बनत आहेत. मेळाव्यात लाखो रुपयांची उलाढाल होते. पण किती लग्न जुळतात हा ही प्रश्न आहे. वधू वर परिचय मेळाव्यात मिळणाऱ्या पुस्तकात कर्तव्य असणाऱ्या मुला मुलींची माहिती दिली असते. त्यामुळे मध्यस्थीची फारशी गरज राहिली नाही. 

वाचा- राज्यातील दहा हजार शिक्षक अतिरीक्त ! -

असे फायदे - तोटे  
विवाह जुळविणाऱ्या संस्था किंवा परिचय मेळाव्यांमुळे स्थळांची उपलब्धता व माहिती घरबसल्या मिळत असून योग्य जोडीदार शोधण्यास भरपूर वाव आहे. जाती उपजातीतील भिंती ढासळत असून रोटी बेटी व्यवहार सुरू झाले. दुरदुरचे संबंध जुळत आहेत. मात्र मध्यस्थांचा दोन्ही पक्षावरील दबाव नाहीसा झाल्याने अनेक विवाहसंबंध तुटत आहेत. कुटुंब व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. प्रेमविवाहाचे प्रकार वाढत असून मुले मुली पाळण्याचे प्रकार समाज विघातक ठरत आहेत.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image