विद्यार्थी नव्हे चक्क बोगस भरारी पथक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

नाशिक रोडः भरारी पथक असल्याची बातवणी करून विद्यार्थ्यांना व शाळेला फसवू पाहणाऱ्या दोन युवकांना निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने उघडे पाडले. मात्र, हे दोघे फरारी असून, त्यांचा शोध सुरू आहे. 

नाशिक रोडः भरारी पथक असल्याची बातवणी करून विद्यार्थ्यांना व शाळेला फसवू पाहणाऱ्या दोन युवकांना निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने उघडे पाडले. मात्र, हे दोघे फरारी असून, त्यांचा शोध सुरू आहे. 

दहावी- बारावीची परीक्षा म्हटली, की कॉपी, डमी विद्यार्थी यांसारख्या प्रकारांचा बोलबाला असतो. मात्र, दर वर्षीच दिसणारे हे चित्र अगदीच क्षुल्लक वाटावे, असा हा प्रकार गुरुवारी (ता. 1) जेल रोड येथील अभिनव मराठी शाळेत दहावीच्या पहिल्याच पेपर सुरू होण्यापूर्वी उघडकीस आला. या प्रकरणी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव आणि बोर्डाचे अधिकारी एम. व्ही. कदम यांनी तातडीने शाळेत येऊन केंद्र संचालिकांना उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार, पुढील प्रक्रिया सुरू होती. 

दहावीचा पहिलाच पेपर असल्याने गुरुवारी सकाळपासूनच शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होती. पेपरला तासभर वेळ असताना, तिशीच्या आतील दोन सुशिक्षत युवक शाळेत आले. त्यांनी मुख्याध्यापिका ऊर्मिला भालके व केंद्र संचालिका जयश्री ठाकरे यांची भेट घेऊन आपण बोर्डाच्या भरारी पथकाचे सदस्य असल्याचा दावा केला. बोर्डाची झेराक्‍स कागदपत्रे तसेच, खोटे ओळखपत्र दाखवले. खात्रीसाठी भ्रमणध्वनी क्रमांकही दिला. काही शिक्षकांच्या ओळखी सांगितल्या. केंद्र संचालिका व मुख्याध्यापिकेने दोघांवर कसाबसा विश्‍वास टाकला. या दोघांनी कॉपीमुक्त अभियानासाठी आपण शाळेत आल्याचे सांगून शिक्षकांशीही बोलायचे असल्याचे सांगितले. मात्र, शिक्षकांना येण्यास वेळ होता. त्यामुळे हे दोघे बाहेर येऊन विद्यार्थ्यांची तपासणी करू लागले. 
दरम्यान, निवृत्त उपजिल्हाधिकारी श्री. पवार दहावीच्या परीक्षेसाठी नातवाला घेऊन शाळेत आले होते. या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव व एसएससी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे हा प्रकार सांगितला. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी या शाळेत पथक पाठवलेच नसल्याचे सांगितल्याने पवार यांना आश्‍चर्य वाटले. मात्र, त्यांनी पुढील हालचाल करण्यापूर्वीच तरुण फरारी झाले. केंद्र संचालिका ठाकरे यांनी त्या युवकांच्या दूरध्वनीवर संपर्क साधला. मात्र, प्रतिसादच मिळाला नाही. तोपर्यंत शिक्षण उपसंचालक जाधव शाळेत आले. केंद्र संचालकांना उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. श्री. जाधव यांनी अन्य शाळांनाही सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. 
 

Web Title: marathi news ssc bogas scod