जिद्द-सुगंधाताईंना "चहा'ने दिली ओळख 

residentional photo
residentional photo

   नाशिक उद्याचा दिवस कसा असेल, माहिती नाही. मात्र आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करताना आलेल्या संकटांवर मात करीत अनेक जण यशस्वी होत असतात. त्यातीलच एक म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या सुगंधाताई जाधव..! 

     सुगंधा अनिल जाधव, माहेर घोटी, तर सासर नाशिकच्या रविवार कारंजा येथील. शिक्षण अवघे सातवी पास. वडील रामचंद्र मुकुंद क्षीरसागर यांचे मोठे एकत्रित कुटुंब. गरिबी पाचवीलाच पुजलेली. वडील हमालीकाम करत कुटुंबाला मदत करत होते. भाऊ गावात चिक्की आणि खाद्यपदार्थ विकून कुटुंबाला हातभार लावत होता. कुटुंबाच्या एका जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी सुगंधाताई विवाहबंधनात लवकर अडकल्या अन्‌ त्यांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले.

    सुगंधाताई यांच्या सासरीही परिस्थिती जेमतेम... पती अनिल यांचे शिक्षण दहावी... अनिल रिक्षा चालवत होते, तीही भाड्याची. यात कुटुंबाचा आर्थिक गाडा ओढला जात नव्हता. याच काळात सासू-सासरे यांच्यासोबतच पवन आणि ओम या दोन मुलांच्या निमित्ताने कुटुंबाची सदस्यसंख्या सहावर पोचली होती. आधीच खायची भ्रांत... अनेकदा कुटुंबात उपाशी राहण्याची वेळ येत होती... मात्र परिस्थितीशी दोन हात करण्याची शिकवण वडिलांनी दिलेली असल्याने सुगंधाताई यांनी पती अनिल यांना विश्‍वासात घेत नाशिकच्या जिल्हा न्यायालयाजवळ चहाची टपरी टाकण्याची इच्छा व्यक्त केली. अनिल यांच्या साथीने जिल्हा न्यायालयाजवळ टपरी सुरू केल्यानंतर काही दिवसांतच पती अनिल यांचे लिव्हर खराब झाल्याने निधन झाले. जिल्हा रुग्णालयातून अनिल यांचे पार्थिव आणून अंत्यविधी करण्यासाठीही कुटुंबाकडे पैसे नव्हते. कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी सरसावलेल्या सुगंधाताई यांच्यासाठी हे दुःख गडद होते. सुगंधाताई यांनी लोकवर्गणीतून अंत्यविधी केला. हा प्रसंग सांगताना सुगंधाताईंना अश्रूंना रोखणे कठीण झाले होते. 

सुगंधाताई बनल्या कुटुंबप्रमुख 
पतीच्या अकाली जाण्याने सासू-सासरे आणि मुलांसाठी त्याच आता कुटुंबाचा आधार बनल्या. कुंकू गेल्याचे दुःख दूर सारत त्यांनी आता चहाची टपरी चालविण्यासाठी पुढाकार घेतला. पहिल्या दिवसाची कमाई होती 38 रुपये... मात्र या कमाईनेच कुटुंबाला जगण्याची दिशा मिळाली. चहाची टपरी चालवतानाच मुलगा पवन आणि ओम यांना शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. दोन्ही मुलांना पदवीपर्यंतचे शिक्षण देत त्यांनी आपले अर्ध्यावर सुटलेले शिक्षण मुलांच्या निमित्ताने पूर्ण केले. आईच्या कष्टाची जाणीव असलेल्या दोन्ही मुलांनीही व्यवसायात झोकून दिले. मोठा मुलगा पवन याचे लग्न झाले असून, सून सुवर्णाताई यासुद्धा सुगंधाताई यांच्या कामात अधूनमधून मदत करत असतात. 


खचून जाऊ नका... 
आयुष्याच्या वाटचालीत अनेक खाचखळगे पार करत सुगंधाताई यांनी खेचून आणलेले यश नक्कीच इतरांसाठी प्रेरणा देणारे आहे. कोणत्याही व्यवसायात जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा असेल तर यश नक्कीच मिळते, यावर सुगंधाताई यांचा ठाम विश्‍वास आहे. कुटुंबाला आधार देतानाच कोणतीही वेळ सांगून येत नाही. गरजेला दोन पैसे हातात राखून ठेवा, कुटुंबाचा आधार बनून स्वतःला सिद्ध करा. महिलांनी कोणत्याही व्यवसायात उभे राहताना कामाची अजिबात लाज न बाळगता व्यवसाय पुढे न्यावा, आयुष्यात आलेल्या प्रसंगांना सामोरे जाताना गरजू महिलांसाठी भविष्यात काम करणार असल्याचे सुगंधाताई सांगतात. 

स्मार्टसिटीमध्ये चाकरमान्यांचाही विचार व्हावा... 
नाशिकमध्ये अनेक कुटुंबे हातावर पोट भागवतानाच रोजची लढाई लढताहेत. अनेक कुटुंबे रोज हातगाडीवर अथवा तात्पुरत्या स्वरूपाचे व्यवसाय थाटत कुटुंबाला आधार देतात. नाशिकची वाटचाल स्मार्टसिटीकडे होत असतानाच फेरीवाले अथवा हातावर पोट भागवत दैनंदिन व्यवसाय करणाऱ्यांसाठीही विशेष व्यवस्था पुरविण्याकडे महापालिकेने लक्ष दिल्यास नक्कीच अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळेल. 
संपर्क ः सुगंधा जाधव (मो. 9226325180) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com