‘मेघदूत' अँप : घरबसल्या मिळणार हवामानाची पूर्वसूचना

सम्राट महाजन
Friday, 26 June 2020

शेतकऱ्यांना पिकांचे योग्य नियोजन करीत हवामानामुळे होणारे पिकाचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मेघदूत अँपचा वापर करणे अपेक्षित आहे. 

तळोदा : शेतकऱ्यांना पावसाची स्थिती, हवामानाचा अचूक अंदाज जसे की वादळ, अति पाऊस, दुष्काळ, गारपिट, तापमान, आद्रता, वाऱ्याचा वेग तसेच पिकनिहाय व पशूसल्ला मिळावा यासाठी कृषी विभागाने मेघदूत अँप विकसित केले आहे. या अँपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरबसल्या आवश्यक ती माहिती मोफत मिळणार आहे. मेघदूत अँपचा वापर करीत शेतकऱ्यांना पिकांचे योग्य नियोजन करीत हवामानामुळे होणारे पिकाचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मेघदूत अँपचा वापर करणे अपेक्षित आहे. 

गेल्या काही वर्षापासून हवामानातील बदलामुळे दुष्काळ, तापमानात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, गारपीट, अतिवृष्टी, चक्रीवादळे, पावसाचे असमान वितरण, पावसात पडणारा खंड यामुळे दरवर्षी शेतकरी बांधवांचे नुकसानीचे प्रमाण वाढतच चालेले आहे. या बदलांमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होऊन आर्थिक झळ सोसावी लागत आहे. हवामानातील बदलांविषयी शेतकऱ्यांना त्वरित माहिती मिळावी व त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नियोजन करता यावे यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान विज्ञान संस्था, पुणे यांच्यातर्फे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मेघदूत' अँप विकसित करण्यात आले आहे. 

हे आहेत या कृषि ॲपचे फायदे 
हे अँप शेतकऱ्यांसाठी फार उपयोगी असून त्याच्या सहाय्याने शेतकरी जिल्ह्याचा पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, पाऊस आदी बाबत माहिती मिळू शकतो. या अँपवर शेतकऱ्यांना पीकनिहाय व पशूबाबत देखील सल्ला मिळू शकतो. विशेष करुन शेतकऱ्यांना ही सर्व माहिती मातृभाषेत म्हणजेच मराठीत मिळण्याची सोय आहे. दर मंगळवारी आणि शुक्रवारी या अँपला ग्रामीण कृषि मौसम सेवा - कृषि हवामान केंद्र, नंदुरबारकडून माहिती पुरविली जात आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अँपचा वापर करण्याचे आवाहन कृषि मौसम सेवा - कृषि हवामान केंद्र, नंदुरबार यांच्याकडून करण्यात आले आहे. 

फायदेशीर अँप 
मेघदूत ॲपच्या माध्यमातून देशातील तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मागील दहा दिवसांचे हवामान, पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज, त्याचबरोबर कृषी व पशू सल्ला मोफत उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज पाहून पिकाचे नियोजन करता येते. पिकाला पाणी देणे, फवारणी करणे, खते देणे, आंतरमशागतीची कामे करणे सोयीचे होते. त्यामुळे हे अँप शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. 
 
नंदुरबार येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा - कृषि हवामान केंद्र मार्फत मेघदूत अँपबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांसाठी हे ॲप फारच फायदेशीर आहे. अँड्रॉईड मोबाईलवर प्ले स्टोअरमधून हे अँप डाउनलोड करुन नोंदणी करावी, आपला जिल्हा निवडून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. 
- सचिन फड, कृषि हवामान तज्ञ, नंदुरबार. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda agree culture department create meghdut aap farmer information