मोफत मिळणार पाच किलो हरभराडाळ  

फुंदीलाल माळी
Saturday, 21 November 2020

कोरोनाकाळात अंत्योदय शिधापत्रिकाधारक व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ दिला होता. या योजनेतील जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांतील प्रत्येकी एका कार्डवर एक किलोप्रमाणे पाच किलो हरभराडाळ मोफत मिळणार आहे.

तळोदा (नंदुरबार) : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांची प्रत्येकी एक किलोप्रमाणे पाच किलो हरभराडाळ प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबरमध्ये एकत्रित मिळणार आहे. ही हरभराडाळ विनामोबदला मिळणार असून, यासाठी २६६ टन हरभराडाळ नंदुरबार जिल्ह्यासाठी मिळाली आहे. कोरोनाकाळात अंत्योदय शिधापत्रिकाधारक व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ दिला होता. या योजनेतील जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांतील प्रत्येकी एका कार्डवर एक किलोप्रमाणे पाच किलो हरभराडाळ मोफत मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये हरभराडाळ देण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे. 

२६६ टन मंजूर
योजनेच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत मोफत वितरण करावयाच्या हरभराडाळीचे एकूण नियतन २६६ टन मंजूर झाले आहे. रेशन दुकानदारांनी पॉस मशिनद्वारे ही डाळ वितरित करणे अनिवार्य आहे. यासाठी तळोदा तालुक्यात एकूण एक हजार ३७५ क्विंटल हरभराडाळीचे वितरण होणार आहे. 
 
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत पाच महिन्यांची पाच किलो हरभराडाळ एका कार्डवर मोफत मिळणार आहे. हरभराडाळ रेशन दुकानदारांनी योग्य रीतीने वाटप करावयाची आहे. हरभराडाळ मोफत देण्यात येणार असल्याने दुकानदारांनी कोणतेही शुल्क आकारू नये. हरभराडाळ वाटपात तक्रारी आल्यास रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल. 
- संदीप परदेशी, पुरवठा निरीक्षक, तळोदा 
 
नंदुरबार जिल्‍ह्यातील कार्डधारक 
अंत्योदय योजनेचे कार्डधारक : १,०६,६९८ 
प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारक : १,७०,५८८ 
एकूण : २,७७,२८६ 
 
संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda chana dal free five month