esakal | गुजरात वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला तळोदा वनविभाग
sakal

बोलून बातमी शोधा

bibtya

तळोदा तालुक्यात बिबट्यांची उपस्थिती दररोजच्या विषय झाला आहे. तळोदा शिवार व त्यासोबत असलेल्या उंटावद, काजीपुर, बहुरूपा, निंभोरा तसेच मोड, बोरद, चिनोदा, प्रतापपूर या गावांच्या शिवारात नेहमी बिबट्यांचे दर्शन होत असते.

गुजरात वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला तळोदा वनविभाग

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा (नंदुरबार): निंभोरा शिवारात गुजरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने तळोदा वनविभाग पिंजरा लावण्यासाठी अशीच तत्परता दाखवेल काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात तळोदा तालुका व परिसरात बिबट्यांची संख्या नेमकी किती यावरही वन विभागाने ठोस उपाययोजना करून बिबट्यांची संख्या निश्चित समजण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यात बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात दिरंगाई होत असल्यानेच बिबट्याची दहशत वाढत असल्याचेही बोलले जात आहे. 
तळोदा तालुक्यात बिबट्यांची उपस्थिती दररोजच्या विषय झाला आहे. तळोदा शिवार व त्यासोबत असलेल्या उंटावद, काजीपुर, बहुरूपा, निंभोरा तसेच मोड, बोरद, चिनोदा, प्रतापपूर या गावांच्या शिवारात नेहमी बिबट्यांचे दर्शन होत असते. त्यामुळे तालुक्यात बिबट्यांची नेमकी संख्या किती यावर देखील मतमतांतरे व्यक्त होतांना दिसतात. त्यात बिबट्यांची संख्या तालुक्यात पंधरापेक्षा अधिक असल्याचीही चर्चा होत आहे. त्यासाठी वनविभागाने विशेष मोहीम राबवून तालुक्यात बिबट्यांची नेमकी संख्या किती यावर कार्यवाही होणे आवश्यक आहे. 

तळोदा वनविभागा अगोदर तत्‍परता
शेतकरी बिबट्या दिसल्यास वारंवार वनविभागाला कळवतात. मात्र पिंजरे लावण्यात वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे गुजरात वन विभागाने शेतकऱ्यांनी सूचना दिल्यानंतर तात्काळ कारवाई केल्याने निंभोरा शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. तत्परतेने कार्यवाही केल्यास बिबट्यांच्या बंदोबस्त करून त्यांना सुरक्षित जंगलात सोडण्याची कार्यवाही करता येऊ शकते. हेच गुजरात वन विभागाने दाखवून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तळोदा वनविभागाने देखील पिंजरे लावण्याची व बिबट्यांचे संख्या मोजण्याची कार्यवाही तत्परतेने करण्याची गरज आहे. 

पक्षी सप्ताहाचा विसर
दरवर्षी साजरा होणारा पक्षी सप्ताह देखील वनविभाग साजरा करू शकला नव्हता. एकीकडे वृक्ष लागवड व संगोपन करण्याची जबाबदारी असलेल्या वन विभागाने प्राण्यांकडे देखील दुर्लक्ष केल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. मानव व बिबटे यांच्या दररोजचा संघर्ष तालुक्यात होत असताना व शेतकऱ्यांचे बळी व शेकडो प्राण्यांचे जीव जात असताना वनविभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने गुजरात वन विभागासारखी तत्परता तळोदा वनविभाग दाखवेल काय याची चर्चा सुरू झाली आहे. 
 
आता तरी लक्ष देणार का?

वनविभागाने विशेष मोहीम राबविल्यास बिबट्यांची नेमकी संख्या कळण्यास मदत होऊ शकते. त्या विशेष मोहिमेत संपूर्ण तालुका व परिसरात बिबट्याचे ठसे घेणे, शिकार केलेले प्राणी व बिबट्याची विष्ठा यांचे अवलोकन करणे. बिबट्याचे पिलू आढळल्यास त्यांना टॅगिंग करणे. अशी कामे करता येऊ शकतात. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image