चक्‍क शासकिय कर्मचारी सुटीच्या दिवशी कार्यालयात आणि करताय काम

सम्राट महाजन
Sunday, 13 December 2020

अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना मदत होण्यासाठी त्यांना खावटी अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत असून त्यासाठी लाभार्त्यांची अर्ज भरुन त्यांच्या अर्जांची डेटा एन्ट्री पोर्टलवर करण्याचे काम सुरु आहे.

तळोदा (नंदुरबार) : 'सरकारी काम आणि बारा महिने थांब' अशी म्हण असून या म्हणीचा अर्थानुसार प्रत्यक्ष अनुभव असंख्य नागरिकांना कधी ना कधी आलेला आहे. मात्र तळोदा प्रकल्प कार्यालयात अगदी या उलट दृश्य दिसून येत आहे. प्रकल्पधिकारी अविशांत पंडा यांच्या सूचनेनुसार शनिवार व रविवारी सुट्टीचा दिवशी देखील कर्मचारी उपस्थित राहून खावटी अनुदानाच्या अर्जांची एन्ट्री करीत आहेत. ही दृश्ये बघून सर्वांना आश्चर्यासह सुखद धक्का बसत आहे.

सुट्टीचा दिवशी देखील काम
अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना मदत होण्यासाठी त्यांना खावटी अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत असून त्यासाठी लाभार्त्यांची अर्ज भरुन त्यांच्या अर्जांची डेटा एन्ट्री पोर्टलवर करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तळोदा प्रकल्पातंर्गत हे काम काही काळासाठी ठप्प झाले होते. त्यामुळे खावटी अनुदानासंदर्भात तळोदा प्रकल्प अंतर्गत करण्यात येणारी कामे काही प्रमाणात का होईना पण मागे पडली होती. मागे पडलेल्या कामाची भर काढण्यासाठी तळोद्याचे प्रकल्पधिकारी अविशांत पंडा यांनी शनिवार, रविवार सुट्टीचा दिवशी देखील कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर राहत काम करण्याची सूचना केली होती. त्यानुसार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काल व आज रविवारी सुट्टीचा दिवशी हजेरी लावत काम पूर्ण करण्यास प्राथमिकता दिली आहे.

विशेष कक्षाची निर्मिती
खावटी अनुदानाचे अर्ज पोर्टलवर भरण्यासाठी प्रकल्प कार्यालयात एक व मुलींचा होस्टेलमध्ये तात्पुरत्या स्वरुपात एक रुम तयार करण्यात आला आहे. या रुममंध्ये प्रकल्प कार्यालयाचे जवळपास 40 कर्मचारी व जवळपास 20 शिक्षक असे एकूण 60 चा आसपास कर्मचारी काम करीत आहेत. ही दृश्ये बघून सर्वांना सुखद धक्का बसत आहे.

अधिकाऱ्यांची देखरेख
कर्मचाऱ्यांना दिलेले काम वेळेत पूर्ण व्हावीत व त्यांच्या अडचणींचे समाधान शोधण्यासाठी सहाय्यक प्रकल्पधिकारी अमोल मेटकर, सहाय्यक प्रकल्पधिकारी शैलेश पटेल, सहाय्यक प्रकल्पधिकारी एन. डी. जानगर, सहाय्यक प्रकल्पधिकारी सुवर्णा सोलंकी प्रयत्न करीत आहेत. तसेच सहाय्यक प्रकल्पधिकारी एस. एम. चौधरी, सहाय्यक प्रकल्पधिकारी एन. डी. ढोले तसेच शिक्षण विस्तार अधिकारी जी. डी. आकडमल, बी. एम. कदम, बी. आर. मुगळे आदी धडगाव, तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील ठिकठिकाणी जात अर्जांचा आढावा घेत आहेत.

खावटी अनुदान योजना गोर गरिबांसाठी महत्वाची असल्याने, त्यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सर्वजण वेळ, काळ व सर्वात महत्त्वाचे सुट्टी न बघता मेहनत घेत आहेत, त्याचा मला आनंद आहे. पोर्टलवर माहिती अपलोड झाल्यानंतर त्या सर्व माहितीची पडताळणी प्रकल्प स्तरावर करण्यात येणार आहे.
- अविशांत पंडा, प्रकल्पधिकारी, तळोदा. 

संपादन ः राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda project office all staff work in holiday