esakal | सातपुड्यातील सिकलसेल वर ठोस उपाययोजनांची गरज 

बोलून बातमी शोधा

सातपुड्यातील सिकलसेल वर ठोस उपाययोजनांची गरज 

पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सिकलसेल आजारासंदर्भात माहिती देऊन स्वतंत्र रुग्णालये लॅबोरेटरी सह काढण्याची गरज असल्याचे मी सांगितले होते . पंतप्रधान महोदयांनी यावर सकारात्मक आश्वासन दिले होते. त्यामुळे सिकलसेल साठी स्वतंत्र रुग्णालये असावीत. उत्तर महाराष्ट्रात सिकलसेल आजाराचे रुग्णांची संख्या व वाहकांची संख्या पाहता स्वतंत्र यंत्रणा विकसित व्हावी. 
पद्मश्री डॉ सुदाम काटे, सिकलसेल आजाराचे अभ्यासक.
 

सातपुड्यातील सिकलसेल वर ठोस उपाययोजनांची गरज 
sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा : नंदुरबार जिल्ह्याला लागलेला सिकलसेल आजाराच्या विळखा सोडविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सिकलसेल तपासणी केंद्रे व आजाराचे वेगळे दवाखाने काढण्याची गरज आहे. आजाराच्या वाढता प्रसार पाहता जिल्ह्यात सिकलसेल साठी स्वतंत्र रक्ततपासणी यंत्रणा कार्यान्वित करून जनजागृतीवर भर दिला जावा यासाठी विशेष यंत्रणा उभी व्हावी. सिकलसेल आजाराला पायबंद घालण्यासाठी राज्याचे राज्यपाल जिल्ह्यात आले असतांना या आजारासंदर्भात ठोस कारवाई होण्याची अपेक्षा आहे. 

क्‍लिक कराः  जळगाव कलेक्‍टर टोचतात सिव्हील यंत्रणेचे कान..तेव्हा !
 

जिल्ह्यात कुपोषण व बालमृत्यू समस्या नंतर सिकलसेल आजाराची समस्या मोठी आहे . या आजाराचे सर्वाधिक रुग्ण सातपुडा पर्वताच्या गाव पाड्यांवर राहणारे व पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये आहेत. या आजारात सर्वसामान्य व्यक्तीत लाल रक्तपेशी वाटोळ्या आकाराच्या असतात तर सिकलसेल मध्ये लाल रक्तपेशी विळयाच्या आकाराच्या होतात . त्यामुळे रक्तक्षय म्हणजेच सिकलसेल ऍनिमिया होतो . यात पेशींची लवचिकता कमी होत असल्याने शरीरात गुंतागुंत निर्माण होते .तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबिन जनुकाचा उत्परिवर्तनामुळे तांबड्या पेशी चा आकार बदलतो. 

आर्वजून पहा :अरे वा... आता केळी वाहतुकीसाठी वातानुकूलित वॅगन्स 
 

हा एक आनुवंशिक आजार असून माता-पित्यांकडून त्यांच्या अपत्याला देखील हा आजार होतो .त्यामुळे या आजारात जनजागृतीची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. या आजारासाठी काही स्वयंसेवी संस्थांकडून रक्त तपासणी व उपचार केंद्र चालवले जातात . एम के सी एल सारखी सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीने देखील या आजारा संदर्भात सॉफ्टवेअर विकसित केले आहे. मात्र जनजागृती अभावी या आजाराचा प्रसार वाढत जात असल्याचे दिसून येते . 

संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात या आजाराचे तीस हजार रुग्ण आहेत तर या आजाराचे वाहक असलेल्या लोकांची संख्या पाच लाखाच्यावर असल्याचे सिकलसेल आजार संदर्भात जनजागृती व उपचार करणारे तज्ञ सांगतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आजाराचे वाहक असल्याने या वाहकांची जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे . सिकल सेल आजारात रक्त तपासणी करण्याची वारंवार गरज पडते त्यामुळे रक्त तपासणी केंद्र व विशेष दवाखाने काढण्याची गरज जिल्ह्यात आहे. 

नक्की वाचा : तमाशाकडे वळणारे पाय वळले कीर्तनाकडे
 

सिकलसेल आजारात रुग्णाला शासनाकडून ६०० रुपये दिले जातात. तेच आंध्रप्रदेश सरकारकडून या आजारासाठी दहा हजार रुपये दिले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात देखील या आजाराचे रुग्णांना आर्थिक मदत वाढवून मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यपाल महोदय या मागण्यांकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.