तळोद्यातील आश्‍चर्यकारक प्रकार...वादाच्या भितीने पालिका सभा तहकूब 

तळोद्यातील आश्‍चर्यकारक प्रकार...वादाच्या भितीने पालिका सभा तहकूब 

तळोदा ः पावसाळयापूर्वी करायची कामे यासह शहरवासियांच्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर निर्णयाची अपेक्षा असलेली येथील नगरपालिकेची आजची नियोजित सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करण्यात आली. एकही निर्णयावर चर्चा न होता तहकूब झालेल्या या सभेबाबत वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. अजेंड्यांवरील काही विषयांवर असलेले मतभेद व त्यातून निर्माण होणारे वादविवाद टाळण्यासाठी ही सभा तहकूब करावी लागल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. मात्र यामुळे शहराचा विकासाचा दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अनेक विकास कामांना अनिश्चित काळासाठी ब्रेक लागला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स राखले जावे यासाठी पालिका आवारात मंडप टाकण्यात आला होता. आजच्या सभेत एकूण ५४ विषयांवर चर्चा होणार होती. यात शहराचा विकासाचा व मान्सूनपूर्व तयारीचा दृष्टीने अनेक महत्वपूर्ण विषयांचा समावेश होता. काही कामांचा वार्षिक मक्ता देण्याचाही विषय होता. मात्र याचवेळी आजच्या सभेत काही वाद निर्माण होऊ शकतात असे विषय असल्याची चर्चा कालपासून शहरात रंगली होती. आज सकाळी तर शहरवासियांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र ऐनवेळी सभा तहकूब करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. याला तळोदा भाजपअंतर्गत असलेला कलह देखील कारणीभूत असल्याचे चर्चिले जात आहे. 

पालिका आवारात काँग्रेस गटनेते गौरव वाणी, प्रतोद संजय माळी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, सुभाष चौधरी, नगरसेविका अनिता परदेशी, कल्पना पाडवी आदी उपस्थित होते. सभेत वाद होवू शकतो अशी माहिती मिळाल्याने नंदुरबार येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. स्मारक चौक व पालिका परिसरात पोलीस तैनात करण्यात आले होते. 

सभा तहकूब झाल्याने अनेक महत्वपूर्ण विषयांना आता ब्रेक लागला आहे. त्यात नगर परिषदेच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक २५/२ जागेवर बांधकाम करण्यात आलेल्या गाळ्यांचा सध्याचा बाजार भावानुसार अधिमुल्य निश्चित करण्यात येणार होते. पाणीपुरवठा विभागाचे जलवाहिनी दुरुस्ती, मोटरपंप दुरुस्ती, टीसीएल पावडर पुरवठा करण्यासंदर्भात चर्चा होती. नव्याने बांधण्यात आलेल्या आदिवासी सामाजिक सभागृहात इलेक्ट्रिक फिटिंग करणे तसेच नवीन प्रशासकीय इमारतीत इलेक्ट्रिक फिटिंग करणे, लॅन फिटिंग करणे व इंटरकॉम सुविधा बसविणे या विषयावर चर्चा करण्यात येणार होती. त्याचप्रमाणे चिनोदा चौफुलीपासून ते पालिका हद्दीपर्यत आणि हातोडा रोडपासून ते पालिका हद्दीपर्यत रस्ता रुंदीकरण, डिव्हायडर, फुटपाथ आदी कामे करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार होती. साफसफाई, अतिक्रमण काढणे व आरोग्य विभागातील सुरक्षा उपकरण्यांचा खरेदीस मंजुरी देणे यांसारख्या अनेक महत्वपूर्ण विषयांवर आजच्या सभेत चर्चा होऊन त्यांना मंजुरी मिळणार होती. मात्र सभाच तहकूब झाल्याने आता या सर्व कामांना अनिश्चित काळासाठी ब्रेक लागला आहे. 
 

या विषयांवर वादविवादाची होती शक्यता 
सभेच्या अजेंड्यावर काही असे मुद्दे होते की ज्यामुळे वादविवाद होवू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यात विषय क्रमांक ४४ ज्यात बायोडिझेल पंपासाठी ना हरकत दाखला मिळण्याबाबत चर्चा करणे, विषय क्रमांक ४५ ज्यात न. पा. हद्दीत परमिट रुम ( बियर बार ) व्यवसाय प्रयोजनार्थ ना हरकत दाखला मिळण्याबाबत तसेच विषय क्रमांक ४७ ज्यात मेन रोडवरील अस्तित्वात असलेली सार्वजनिक मुतारी हलविण्याबाबत चर्चा होणार होती. मात्र या विषयांवरुन सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद असल्याची शक्यता वर्तवित मतभेदाचे रुपांतर वादविवादामध्ये होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. कदाचित त्यामुळेच सभा तहकूब करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

-सभेत असे काही विषय होते, की ज्याने वादविवाद झाला असता, वाद अधिक वाढू नये यासाठी आमदारांनी भाजपा नगरसेवकांची खासगीत बैठक घेतली व वाद मिटविण्यात आले. मात्र एकंदर सर्व परिस्थिती लक्षात घेता आजची सभा तहकूब करण्यात आली आहे. 
- अजय परदेशी, नगराध्यक्ष, तळोदा. 

- सभा तहकूब होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, आम्ही नेहमी विकास कामांना साथ दिली आहे. नगराध्यक्ष यांची मंजुरी असल्याने आजच्या सभेत येणारे विषय अनधिकृत कसे होऊ शकतात. सभा न झाल्याने अनेक कामांना खीळ बसू शकते. कोरोनाचा पार्श्वभूमी लक्षात घेता भविष्यात या कामांना निधी उपलब्ध होईलच याची काहीच शास्वती नाही. 
- गौरव वाणी, गटनेता, काँग्रेस. 

गोपनीय माहितीनुसार नगरपालिकेची सभा वादळी होऊ शकते अशी माहिती मिळाली होती. सभेत वादंग निर्माण झाले तर कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेता शहरात अतिरिक्त पोलीस मागविण्यात आले आहेत. 
- विक्रम कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी, अक्कलकुवा. 

सभेचे पीठासीन अधिकारी अर्थात नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी काही अपरिहार्य कारणामुळे आजची सभा रद्द झाल्याचे मला कळविले, त्यानुसार आजची सभा तहकूब करण्यात आली आहे. काही दिवसांनी तहकूब झालेली सभा पुन्हा घेण्यात येईल. 
- सपना वसावा, मुख्याधिकारी, तळोदा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com