esakal | खावटी अनुदान लाभार्थ्यांचे सर्वेक्षणासाठी बोटीतून प्रवास 
sakal

बोलून बातमी शोधा

boat travling

अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना कोरोनाचा बिकट काळात मदत मिळावी यासाठी शासनाने खावटी अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे अर्ज भरण्याचे व भरलेल्या अर्जांचे आदिवासी विकास विभागाचा पोर्टलवर डेटा एन्ट्री करण्याचे काम करण्यात येत आहे.

खावटी अनुदान लाभार्थ्यांचे सर्वेक्षणासाठी बोटीतून प्रवास 

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (धुळे) : प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा व दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट घेण्याची वृत्ती अंगी असेल, तर समोर असलेले काम कितीही अवघड असले तरी ते पूर्णत्वास येऊ शकते. याची प्रचिती खावटी अनुदान संदर्भातील कार्यवाही करताना तळोदा प्रकल्प कार्यालयाचा कर्मचाऱ्यांनी विशेषतः शिक्षकांनी करून दिली आहे. शिक्षक अतिदुर्गम भागातील पाड्यांमध्ये पोहचण्यासाठी डोंगर चढत वेळप्रसंगी बोटीतून प्रवास करीत लाभार्थ्यांच्या सर्वेक्षणाचे व अर्ज भरून घेण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. 

अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना कोरोनाचा बिकट काळात मदत मिळावी यासाठी शासनाने खावटी अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे अर्ज भरण्याचे व भरलेल्या अर्जांचे आदिवासी विकास विभागाचा पोर्टलवर डेटा एन्ट्री करण्याचे काम करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी तळोदा प्रकल्पाचा कर्मचारीसह आश्रमशाळेचे शिक्षक, अधीक्षक, मुख्याध्यापक असे जवळपास ५०० कर्मचारी मेहनत घेत आहेत. 

अतिदुर्गम भागात बोटीने प्रवास - 
धडगाव तालुक्यातील उडद्या, भादल, सादरी, झापी, सिंद्दीगर, शेलगडा, तिनसमाळ, जुगणी तसेच अक्कलकुवा तालुक्यातील धनखेडी, डनेल, बामणी, चिमलखेडी, गमण या ठिकाणी पोहचणे अतिशय अवघड असून यांपैकी काही ठिकाणी पोहचण्यासाठी मध्येच नदी येत असल्याने, पुढे जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते. त्यामुळे शिक्षक अश्या ठिकाणी पोहचण्यासाठी आपल्या दुचाकीसह बोटीतून प्रवास करीत आहेत आणि सर्वेक्षणाचे व अर्ज भरण्याचे काम पूर्ण करीत आहेत. 

शिक्षक, कर्मचाऱ्यांना विशेष प्रमाणपत्र 
तळोदा प्रकल्पांतर्गत येणारे सर्वच कर्मचारी मेहनत घेत आहेत. मात्र अतिदुर्गम भागात जाऊन खावटी अनुदानाच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण, अर्ज भरण्याचे काम करणारे शिक्षक व कर्मचाऱ्यांना तळोदा प्रकल्प कार्यालयामार्फत विशेष प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात येणार असून अशा शिक्षकांची व कर्मचाऱ्यांची यादी बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रकल्पाधिकारी अविशांत पंडा यांनी 'सकाळ' जवळ बोलताना दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image