esakal | पशुधनासाठी संजीवनी...तळोदा येथे उभारले जातेय पाच कोटींचे रुग्णालय
sakal

बोलून बातमी शोधा

Veterinary clinic

तळोदा शहरातील हातोडा रस्त्यावर राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीतील तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय उभारण्याचे काम सुरू आहे. हे चिकित्सालय उभारणीसाठी जिल्हा विकास नियोजनामधून निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

पशुधनासाठी संजीवनी...तळोदा येथे उभारले जातेय पाच कोटींचे रुग्णालय

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा (धुळे) : तालुका लघुपशुवैद्यकीय चिकित्सालयाची सर्व अद्ययावत सोयींनीयुक्त सुमारे पाच कोटी रुपये खर्चून इमारत उभारण्यात येत आहे. इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. चिकित्सालयाची इमारत पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील पशुधनासाठी येथे मोठ्या शस्त्रक्रिया करणेदेखील शक्य होणार आहे. त्यात एक्स-रे मशिन, आजाराची लागण व त्यावरील संशोधन आणि विविध विषयांवरील प्रशिक्षणे देण्याची सोयही उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील पशूपालकांसाठी शासनाची ही मोठी देण ठरणार आहे. सध्या संथ गतीने काम सुरू असून, त्याला गती मिळणे आवश्यक आहे. 
तळोदा शहरातील हातोडा रस्त्यावर राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीतील तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय उभारण्याचे काम सुरू आहे. हे चिकित्सालय उभारणीसाठी जिल्हा विकास नियोजनामधून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यासाठी माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तर हे पशुधन चिकित्सालय अस्तित्वात यावे म्हणून तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सामुद्रे २००६ पासून पाठपुरावा करत होते. 
आता इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने या चिकित्सालयाची ही इमारत पूर्ण झाल्यानंतर येथे विविध पदे भरून कर्मचारी कार्यान्वित होऊ शकणार आहेत. चिकित्सालयात चार कोटी ९० लाख रुपये खर्चून दवाखान्याची मुख्य इमारत, कर्मचारी वसाहत, पाण्याची टाकी, वॉल कंपाउंड, अंतर्गत रस्ते, वीज, गटारी अशा विविध सुविधा तयार करण्याचे काम सुरू आहे. पशुपालक, शेतकरी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हॉलचीही व्यवस्था या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे तालुक्यात अद्ययावत सोयींनी सज्ज असा दवाखाना याठिकाणी तयार होत आहे. 
मोठ्या प्रमाणावर असलेल्या तालुक्यातील पशुधनासाठी सात पशुवैद्यकीय दवाखाने अमोनी, कोठार, प्रतापपूर, बोरद, मोदलपाडा, सोमावल, मोड व तळोदा येथे कार्यरत आहेत. मात्र या चिकित्सालयाची इमारत पूर्ण झाल्यानंतर शेतकरी व पशुपालकांना आपल्या पशूंवर सर्व प्रकारचे उपचार याच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. उपचाराअभावी जे पशू दगावत होते. ती वेळ आता येणार नाही. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या येथील बांधकामाला गती मिळण्याची अपेक्षा पशुपालक व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

तळोदा तालुक्यात एकूण एक लाख ४२ हजार पशुधन उपलब्ध आहे. ते असे 
-गायी व बैल- ३७ हजार 
- म्हशी- दहा हजार 
- शेळ्या- ३१ हजार ४०२ 
- कोंबड्या- ६२ हजार 
-घोडे, गाढव, श्वान, वराह- २५०० 

संपादन : राजेश सोनवणे 
 

loading image
go to top