जातिभेदाच्या भिंती झुगारत "त्यांच्या' आयुष्याचा थक्क करणारा प्रवास 

एस. डी. आहिरे : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पिंपळगाव बसवंत : जन्मतःच देवाने पाय दिले, पण त्यात क्रयशक्ती नसल्याने ते असून नसल्यासारखे... तरीही न डगमगता धैर्याने आयुष्याला सामोरे जाणारे व्यक्ती दुर्मिळच. खचून अगतिक न होता पिंपळगावच्या शैलेश कलंत्री यांनी एम.कॉम.ची पदवी मिळवून आयुष्य आनंदाने फुलविले. असेच काहीसं दुर्दैव माधवीच्याही वाट्याला आले. एका मध्यस्थी व्यक्तीने जातिभेदांना मूठमाती देत दोघांचे भावी आयुष्य फुलविण्यासाठी रेशमीगाठी बांधल्या. 

शैलेश व माधवी कलंत्री यांच्या आयुष्याच्या वेलीवर तनिष्क नावाचे फूल उमलले असून, नशिबाने पाय हिरावले, तरी त्यांचा जीवनप्रवास अगदीच झोकात सुरू आहे. रामेश्‍वर कलंत्री यांचे पुत्र शैलेश यांचे जन्मतःच दोन्ही पाय संवेदनाहीन होते. मुलगा दिव्यांग असला, तरी कलंत्री दांपत्याने संगोपनात कोणतीही कमी ठेवली नाही. देवाने शैलेशला प्रचंड आत्मविश्‍वासाची देणगी दिली. पाय साथ देत नसताना तल्ख बुद्धी त्याला शाळेकडे घेऊन जायची. दिव्यांगत्वाच्या संकटावर मात करत जिद्द, चिकाटी व काहीतरी करून दाखविण्याच्या उमेदीमुळे त्याने एम.कॉम.पर्यंत शिक्षण मिळविले.

जरूर वाचा-कांद्याचे अनुदान पडले खात्यात शेतकऱ्यांने केले परत

अधिकाऱ्यांकडून आर्थिक मागणी

उच्चशिक्षित असल्याने व दिव्यांगांच्या शासकीय नोकरीतील अनुशेषामुळे त्याला 2001 मध्ये भुसावळ रेल्वेकडून तिकीट तपासणी (टीसी) नोकरीसाठी कॉल आला, पण भ्रष्टवृत्तीच्या अधिकऱ्यांनी त्यांच्याकडे आर्थिक मागणी केली. घरची परिस्थिती बेताची असल्याने शैलेशला त्या अधिकाऱ्यांची मर्जी पुरविता न आल्याने नोकरीशिवाय रिकाम्या हाती परतावे लागले. 

एलआयसीचे एजंट होण्याचा मार्ग स्वीकारला 
शैलेशच्या वाट्याला जन्मतःच संघर्ष आला. नोकरी न मिळाल्याने तो ना उमेद झाला नाही. जिद्द असलेल्या माणसाला कोणीच रोखू शकत नाही. तसेच शैलेशबाबत झाले. एलआयसीचे अधिकारी आर. पी. देवरे यांनी शैलेशला एलआयसी एजंट म्हणून काम करण्याचा सल्ला दिला. नियतीपुढे हात न टेकता एलआयसीचे एजंट होण्याचा मार्ग त्याने स्वीकारला. मितभाषी व सत्य बोलणे या शैलेशच्या स्थायीभावामुळे त्याला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. कॅलिपर शूजच्या आधारावर तो ग्राहकापर्यंत मजल- दरमजल करीत पोचत होता. दुचाकी वाहनही तो जिद्दीच्या बळावर शिकला. एलआयसीचे तब्बल 750 ग्राहक त्याच्याकडे असून, 75 हजार रुपये महिना तो स्वकष्टाने कमावतो. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news tanshik birth day in pimpalgaon