त्र्यंबकराजा विकासाला ब्रेक

कमलाकर अकोलकर
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

त्र्यंबकेश्‍वर : बारा ज्योतिर्लिंगांत दहाव्या क्रमांकावर असलेल्या त्र्यंबकेश्‍वर तीर्थक्षेत्राचा विकास हा आपसातील वाद, प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ठप्प आहे. या ज्योतिर्लिंगाच्या समस्या किंवा विकासात्मक कामे ही 12 वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थावेळी तेवढ्यापुरती होत असल्याचे चित्र आहे. 

त्र्यंबकेश्‍वर : बारा ज्योतिर्लिंगांत दहाव्या क्रमांकावर असलेल्या त्र्यंबकेश्‍वर तीर्थक्षेत्राचा विकास हा आपसातील वाद, प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ठप्प आहे. या ज्योतिर्लिंगाच्या समस्या किंवा विकासात्मक कामे ही 12 वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थावेळी तेवढ्यापुरती होत असल्याचे चित्र आहे. 

त्र्यंबकेश्‍वर येथे 1985 पर्यंत श्रावण, पौष, कार्तिक महिना व सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत वर्षभर गर्दी असे. इतर वेळी केव्हाही जाऊन दर्शन घ्यावे व प्रांगणात शांत बसावे, अशी स्थिती होती; परंतु लोकसंख्यावाढीनुरूप व प्रसिद्धीमुळे या देवस्थानात आता बाराही महिने दर्शनार्थ रांगा असतात. येथे पूर्वी कारभारी म्हणून जोगळेकर होते. ते सोल ट्रस्टी होते. त्यांच्या कालावधीत या देवस्थानात पूजा-अर्चा, व्यवस्थेबाबतची कडक शिस्त होती. उत्पन्न अल्प असल्याने इमारत दुरुस्त निधी म्हणून त्या वेळी सोमवारी पालखीनंतर भाविकांच्या स्वइच्छेने पावती देऊन तो घेतला जात असे. जोगळेकरांनंतर गोखले महाराज ट्रस्टी म्हणून नेमल्यावर स्थानिक व गोखले बाहेरचे यामुळे वाद निर्माण होऊन तो न्यायालयात नेण्यात आला. पुढे यातून देवस्थानाच्या उत्पन्नाशी निगडित घटक सोडून विश्‍वस्त मंडळ बनविण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिल्यावर पब्लिक ट्रस्ट अस्तित्वात आला. यात शासकीय दोन अधिकारी व इतर स्थानिक घेऊन हे विश्‍वस्त मंडळ कारभार चालवत आहे. त्यातूनही काहींनी नवीन वाद सर्वोच्च न्यायालयात नेऊन उत्पन्नाशी निगडित पुरोहित, पूजक व तुंगार यांचे प्रतिनिधी या विश्‍वस्त मंडळात घेतले आहेत. 

येथील तुंगार ट्रस्ट, जे दिवाबत्ती व साफसफाईचे काम कायम बघतात, त्यांचे उत्पन्न व देवस्थानतर्फे देणगी पावती व दानपेटी उत्पन्न, असे विभागले गेले आहे. यात तुंगार कुटुंबीय आतापर्यंत सर्व उत्पन्न घेत होते. त्यात विभागणी झाल्यानंतरही दरवेळी वादाचे प्रसंग येतात. 

येथे उत्पन्न घेणाऱ्यांनी भक्तांसाठी व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे महादेवी रोडवर भक्तनिवास उभारण्यात आले असून, तेथे भाविकांना राहण्याची सोय आहे. हॉल हा विविध कार्यक्रमांसाठी दिला जातो; परंतु तो सशुल्क आहे. त्याचेही देवस्थानला मोठे उत्पन्न आहे. देवस्थानची बिल्व तीर्थालगत शेती असून, त्याबाबत मोठी अनास्था आहे. 

रोज हजारो भाविक येथे दर्शन व पूजेसाठी येतात. अनेकांना येथे अभिषेक, पूजा करावयाची असते. त्यासाठी स्थानिक पुरोहित येथे त्याची व्यवस्था करतात. त्याबाबत त्यांना दक्षिणा मिळते. पण आता जाचक नियमांमुळे या सर्व गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत. भाविकांची नाराजीदेखील त्याच प्रमाणात वाढत आहे. पूर्वी मंदिर उघडल्यापासून सायंकाळपर्यंत ओल्या वस्त्रानिशी अथवा सोवळे नेसून गर्भगृहात भाविक अभिषेक, पूजा करीत. आता सकाळी सहा ते सात एवढा एकच तास असून, अगदी बोटावर मोजण्याइतक्‍या लोकांना याचा लाभ होतो. येथील भाविकांना दर्शनाची ठोस व्यवस्था उपलब्ध नाही. दरवेळी पुरातत्त्व खात्याचा बागुलबुवा दाखवून देवस्थानतर्फे स्वतंत्र व चांगली व्यवस्था येथे होत नाही. ही ओरड कायम आहे. मंदिरालगत व समोर मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या. त्याला कोणतेही नियम आड आले नाहीत व ज्या देवालयासाठी नियम आहेत, त्यासाठी मात्र आडकाठी, अशी विचित्र अवस्था येथे आहे. येथे भाविकांसाठी कोणत्याही कायमच्या सुविधा नाहीत. प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अथवा अन्नदान याबाबत सर्वदृष्ट्या उत्पन्न मिळविणाऱ्यांतर्फे उदासीनताच आहे. 

सशुल्क दर्शन 
ज्यांना रांगेत तिष्ठत राहून दर्शन घ्यावयाचे नाही, त्यांनी दोनशे रुपये माणशी देऊन झटपट दर्शन घेण्याची व्यवस्था देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आली. यावरून अनेकांनी वाद घालून ती बंद पडण्यासाठी केलेला खटाटोप निरर्थक ठरला. कारण देणगी दर्शनामुळे इतरांच्या उत्पन्नात घट होत आहे. 

दुरूनच दर्शन बरे 
दर्शनरांगा, गर्भगृहात दर्शन अथवा कर्मचाऱ्यांचे येथे कायमचे वाद व त्यामुळे भाविकांची सततची नाराजी, असा प्रसंग येथे नित्याने होतो. रोज येणाऱ्या हजारो भाविक यात्रेकरूंमुळे येथील देवस्थान व त्याच्याशी निगडित सर्वच घटकांना येथे रोजगार उपलब्ध होतो. असे असतानाही फक्त आपल्यालाच सर्व उत्पन्न मिळावे, या वृत्तीमुळे येथील देवस्थानातील व्यवस्थेची व सर्वच त्याच्या समवेतील घटकांची उत्पन्नस्पर्धा भक्तांना मात्र क्‍लेशदायक ठरत आहे. व्यवस्था करण्याऐवजी रोज नवनवीन नियम व वादाने भक्त मात्र दुरूनच दर्शन बरे बाबा, असे म्हणत आहेत. 
 

Web Title: marathi news trambakraja vikas