त्र्यंबकेश्‍वरमध्ये दोनशे कोटींचा जमीन घोटाळा उघडकीस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

नाशिक : कूळ कायद्यातील देवस्थान जमीनविषयक तरतुदी धाब्यावर बसवून जवळपास 75 हेक्‍टर जमीन हडपण्यात आल्याचा प्रकार त्र्यंबकेश्‍वरमध्ये उघडकीस आला असून, कोलंबिका देवस्थानाच्या जमिनीचे फेरफार ज्यांच्या कार्यकाळात झाले ते दहा वर्षांपूर्वीचे दोन तहसीलदार, मंडल अधिकारी, तसेच सहकार खात्यातील अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अकृषक जमिनीचा बाजारभाव लक्षात घेता हा जमीन गैरव्यवहार अंदाजे दोनशे कोटींचा असून, त्यात अनेक अधिकारी अडकणार आहेत. परिणामी, महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

नाशिक : कूळ कायद्यातील देवस्थान जमीनविषयक तरतुदी धाब्यावर बसवून जवळपास 75 हेक्‍टर जमीन हडपण्यात आल्याचा प्रकार त्र्यंबकेश्‍वरमध्ये उघडकीस आला असून, कोलंबिका देवस्थानाच्या जमिनीचे फेरफार ज्यांच्या कार्यकाळात झाले ते दहा वर्षांपूर्वीचे दोन तहसीलदार, मंडल अधिकारी, तसेच सहकार खात्यातील अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अकृषक जमिनीचा बाजारभाव लक्षात घेता हा जमीन गैरव्यवहार अंदाजे दोनशे कोटींचा असून, त्यात अनेक अधिकारी अडकणार आहेत. परिणामी, महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे. नाशिक व परिसरात अशा रीतीने देवस्थान जमिनींची आणखीही काही प्रकरणे समोर येण्याची शक्‍यता आहे. 
शिवसेनेच्या मुंबईतील वांद्रे पूर्वच्या आमदार तृप्ती सावंत यांनी कोलंबिका देवस्थानाच्या 74 हेक्‍टर 19 आर म्हणजे अंदाजे 185 एकर जमिनीबाबत विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्याच्या उत्तरासाठी शासकीय नोंदी तपासताना हा जमीन घोटाळा उघडकीस आला. महसुली कागदपत्रांनुसार शेत सर्व्हे क्रमांक 300, 301 ए 321, 322/1 व 2 ए 323, 325, 326, 327, 328, 358 मधील या जमिनींचे गंगाधर विश्‍वनाथ महाजन, प्रभाकर, सदाशिव, रामचंद्र, वसंत ही शंकर महाजन यांची मुले, मुकुंद रामचंद्र महाजन, प्रमोद महाजन वगैरे मंडळी वहिवाटदार होती. त्यावर कूळ म्हणून आधी बाहेरच्या व्यक्‍तीची कूळ म्हणून नोंद केली गेली. त्यानंतर मूळ वहिवाटदारांची नावे हटवून ती जमीन अकृषक करण्यात आली आणि अखेरीस त्या जमिनीवर वॉटर पार्क व रिसॉर्टचा आराखडा बनवून तो सहकार निबंधकांकडे नोंदला गेला. 
महसूल प्रशासनाने याबाबत विभागीय आयुक्‍त, तसेच शासनाला दिलेल्या अहवालानुसार, तीन प्रमुख मुद्द्यांवर हे जमीन हस्तांतर बेकायदा आहे. मुळात देवस्थान जमिनींना कूळ कायदा लागू होत नाही. तसाही केवळ कृषक वापरासाठीच कूळ कायदा लागू होतो. ज्या क्षणी जमीन अकृषक होते, त्या क्षणी कूळ कायद्यानुसार मिळालेले हक्‍क निरस्त होतात. सहकार खात्यातील निबंधकांनी अशा बेकायदा हस्तांतरित जमिनीवर धर्मादाय आयुक्‍त व शासनाची पूर्वपरवानगी न घेता वॉटर पार्क व रिसॉर्टसाठी भाडेपट्टा नोंदवून घेतला. निबंधकांना तसा अधिकार नाही. या अहवालाच्या आधारे संबंधितांवर संगनमताने जमीन हडपण्यात आल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी, महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे. 
त्र्यंबकेश्‍वर येथील कोलंबिका देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवर महाजन कुटुंबीयांचे कूळ आहे. 2008-2009 च्या दरम्यान देवस्थानाच्या जमिनीवर बांधकाम व्यावसायिक सचिन दिनकर दप्तरी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे लागली. आता तेथे वॉटर पार्क, रिसॉर्ट स्पोर्ट कॉम्प्लेक्‍सचा प्रस्ताव आहे. देवस्थान जमिनीवर कूळबदलासारख्या गंभीर विषयात शासन आणि धर्मादाय आयुक्तांची परवानगीचा नियम धाब्यावर बसवत रामसिंग सुलाने व रवींद्र भारदे या तत्कालीन तहसीलदारांच्या काळात जमिनीवरील कूळ बदलले गेले. अलीकडे त्या जमिनीच्या नोंदीवरून देवस्थानाचे नाव हटविण्याचा अर्ज धर्मादाय आयुक्‍तांकडे करण्यात आला व त्यासाठी महसूलच्या बेकायदा नोंदीचा आधार घेतला गेला, असे चौकशीत उघड झाले. 
सध्या हे प्रकरण जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व विभागीय आयुक्‍त महेश झगडे यांच्या पातळीवर आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून श्री. झगडे यांनी जमिनींच्या प्रकरणांमध्ये कणखर भूमिका घेतली होती. आता विभागीय आयुक्‍त म्हणून ते काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

कोलंबिका कोपणार 
पुराणे, तसेच धार्मिक कथेत त्र्यंबकेश्‍वर येथील कोलंबिका व निलंबिका देवींचा महिमा सांगितला आहे. बाल्यावस्थेतील गोदावरीला गिळंकृत करण्यासाठी निघालेल्या कोलासुरावर पार्वती कोपली आणि तिने कोलासुराचे निर्दालन केले. म्हणून तिचे नाव कोलंबिका, तर नील पर्वतावर वास्तव्य करणारी निलंबिका अशी ती उत्पत्ती आहे. दोन्ही देवस्थानांच्या जमिनींबाबत बऱ्याच उलटसुलट चर्चा आहेत. आता ब्रह्मगिरीचा निसर्ग गिळंकृत करण्यासाठी निघालेल्यांना जणू पुन्हा कोलंबिकेचा कोप अनुभवास येणार आहे. 

कोलंबिका देवस्थान जमिनीसंदर्भातील अनियमितता 
-कायद्यात तरतूद नसताना देवस्थान जमिनीवर कूळ लागले. 
-धर्मादाय आयुक्‍तांची परवानगी न घेता कुळांच्या नावात बदल. 
-अकृषक वापरासाठी कूळ लागत नसताना त्याआधारे फेरफार. 
-वॉटरपार्क रिसॉर्ट लीजची निबंधकांकडे बेकायदा नोंदणी. 

Web Title: MARATHI NEWS TRAMBAKSHWAR