बतावणी करून लुट करणारे दोघे श्रीरामपूरातून जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

नाशिक : कधी जनगणना अधिकारी तर कधी वीज कंपनीचे रिडिंग वा दुरुस्ती कर्मचारी अशी बतावणी करून घरात घुसून सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेणाऱ्या दोघा भामट्यांना नाशिक पोलिसांनी श्रीरामपूरातून अटक केली.

नाशिक : कधी जनगणना अधिकारी तर कधी वीज कंपनीचे रिडिंग वा दुरुस्ती कर्मचारी अशी बतावणी करून घरात घुसून सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेणाऱ्या दोघा भामट्यांना नाशिक पोलिसांनी श्रीरामपूरातून अटक केली.

आठवडाभरापूर्वी म्हसरुळ, पंचवटीत एकाच दिवशी तर दुसऱ्या दिवशी उपनगर परिसरात बतावणी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेणारे संशयित शंकर रामदास लाड (रा. पडेगाव, बेलापूर-पडेगाव रोड, ता. श्रीरामपूर, जि.नगर), संतोष एकनाथ वायकर (रा. बोंबले वस्ती, टिळकनगररोड, तुळजाभवानी मंदिराशेजारी, श्रीरामपूर, जि. नगर) यांनी नाशिक पोलिसांनी झोप उडविली होती परंतु, युनिट दोनच्या पथकाने शिताफीने तपास करीत दोघांना गजाआड केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे संशयित कैद झाल्याने पोलिसांना त्यांचा माग काढता आला. 

संशयित दोघांनी म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका बंगल्यात जाऊन महापालिकेचे जनगणना अधिकारी असल्याचे सांगत, घरात प्रवेश केला. यावेळी एकाने नजर चुकवून सोन्याचे दागिने चोरून नेले तर त्यानंतर काही तासांमध्येच त्यांनी पेठरोडवरील इमारतीमध्ये वीज कंपनीकडून रिडिंग व दुरुस्तीसाठी आल्याचे सांगत वृद्धेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. या दोन्ही घटना गेल्या 15 तारखेला घडल्या होत्या. तर पेठरोडवरील घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे कैद झाले होते. या दोन्ही घटना ताज्या असतानाच दुसऱ्याच दिवशी पुन्हा उपनगर परिसरात वीज कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगून अशारितीने सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. 
 

खडबडून जाग आलेल्या पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील संशयितांचे फोटो प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध केले. तसेच, पोलिसांनी त्यांच्या अंतर्गत असलेल्या समन्वयाच्या सोशल मीडियावरही शेअर केले होते

संशयितांनी औरंगाबादमध्येही अशारितीने गुन्हे केल्याचे समोर आले. औरंगाबाद पोलिसांनी दोघांना अटकही केली होती. त्याची माहिती नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला दोघा संशयितांची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, सहाय्यक निरीक्षक गंगाधर देवडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक श्रीरामपूरात पोहोचले. संशयित राहत असलेल्या परिसरात संशयितांनी सलग तीन दिवस सापळा रचल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील 12 तोळ्याचे सोने सुमारे 3 लाख 96 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली. संशयित पंचवटी पोलीसांच्या चार दिवसांच्या कोठडीत आहेत. 

ही कामगिरी आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, सहाय्यक निरीक्षक गंगाधर देवडे, रवींद्र सहारे, विजय लोंढे, राजेंद्र जाधव, रमेश घडवजे आदींच्या पथकाने बजावली. 
 

Web Title: MARATHI NEWS TWO PERSON ARRESTED