वणी गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचे १७ मार्चला लोकार्पण

दिगंबर पाटोळे
गुरुवार, 15 मार्च 2018

वणी (नाशिक) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘फ्युनिक्युलर ट्रॉली (रेल्वे)' चा लोकार्पण सोहळा १७ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून त्यासाठी सप्तश्रृंगी गडावर प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरु झाली आहे.

वणी (नाशिक) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘फ्युनिक्युलर ट्रॉली (रेल्वे)' चा लोकार्पण सोहळा १७ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून त्यासाठी सप्तश्रृंगी गडावर प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरु झाली आहे.

सप्तश्रुंग गडावर दर्शनाची सुलभता व्हावी म्हणून कार्यान्वित झालेला देशातील पहिल्याच फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम पूर्ण झाले आहे. १७ मार्च सकाळी १०.३० रोजी या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होण्याचे निश्चित झाले असून दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरु आहे. 

गेल्या एक वर्षापासून बीआोटी तत्वावर खाजगीकरणातून साकारलेला देशातील पहिला फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प जवळपास पूर्णत्वास गेलेला आहे. मात्र या प्रकल्पातील तांत्रिक बाबींच्या तपासण्यांच्या कारणास्तव व प्रशासकीय मान्यतेच्या कारणास्तव प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नव्हता. प्रकल्पाचा ४ मार्च रोजी लोकार्पण सोहळा सोहळा जवळपास निश्चित झाला होता. त्यादृष्टीने प्रशासकीय तयारी सुरु होती मात्र ता. २७ फेब्रुवारीला गडावर राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती व यशदाची टीम तसेच दिंडोरीचे खासदार हरीश्चंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनी प्रकल्पाचे सद्यस्थितीतील काम, क्राऊड हॅन्डलिंग, मेटल डिटेक्टर इत्यादी कामांबाबत पाहणी झाली होती. त्यात आपत्ती व्यवस्थापन व यशदाच्या डिझास्टर टीमने काही महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने ट्रॉली व प्लॅटफॉर्म यातील अंतर, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी रेलिंग नाही, माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक जाळ्या बसविणे, पायऱ्या तीव्र उताराच्या असून, त्या एकसारख्या असाव्यात. जेणेकरून भाविक पडणार नाहीत.

दर्शनासाठी श्री गणेश मंदिराची जागा अयोग्य असून त्यात बदल करावा, गर्दी वाढल्यास धक्काबुक्की होऊ नये अशा काही भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सदर कामासाठी ४ मार्चचा लोकार्पन सोहळा लांबणीवर पडला होता. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन, यशदा व जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविण्यात आलेल्या त्रुटींचीही पूर्तता झाली आहे. त्यामुळे लोकार्पण सोहळ्याचा मार्ग मोकळा झाला  अाहे.

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्र्याच्या सचिवालयाकडून आलेल्या दूरध्वनी संदेशानूसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा १७ मार्च रोजी यांचा नाशिक जिल्ह्याचा संभाव्य दौरा असून त्यासाठी ते हेलिकॉप्टरचा वापर करणार असल्याने त्या अनुशंकाने नांदुरी येथे हेलिपॅड तयार करण्यास तसेच हॅलिकॉप्टर उतरविण्यास व उड्डाणास नियमानुसार  आवश्यक परवानग्या, पोलिस बंदोबस्त ठेवण्याचा आदेश पोलिस अधिक्षक कार्यालय, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांना देण्यात आल्या असून त्यादृष्टीने आज (ता. १५) कळवण येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांच्या उपस्थित प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक बोलविण्यात येऊन मुखमंत्र्याच्या संभाव्य दौऱ्याबाबत त्या त्या विभागाने केलेल्या व करावयाचे तयारी बाबत आढावा घेण्यात आला आहे.

दरम्यान नांदुरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने हेलिपॅड बनवण्याचे काम सुरु केले असून नांदुरी ते सप्तश्रृंगी गड घाट रस्त्याची डागदुजी, कठड्यांना रंगरगोटी, साईड पट्टयांची साफसफाईचे कामे युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे. तसेच सप्तश्रृंगी गड ग्रामपंचायत तसेच सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने गडावर प्लस्टिक बंदी व ग्राम स्वच्छतेच्या दृष्टीने वेगाने कामे सुरु करण्यात आले असल्याने शनिवारी (ता. १७) फ्युनिक्युलर ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा निश्चित समजला जात आहे. २५ मार्च पासून गडावर सुरु होणाऱ्या चैत्रोत्सवापूर्वी फ्युनिक्युलर ट्रॉली भाविकांसाठी खुली होणार असल्याने यंदाच्या चैत्रोत्सवात साडेपाचशे पायऱ्या चढु न शकणारे वृध्द, अपंग भाविकांबरोबरच जलद गतीने आदिमाया भगवतीचे दर्शन घेवू इच्छिणारे भाविक सहजतेने देवीचरणी लीन होऊ शकणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Marathi news vani news funicular trolley inauguration