नामपूरला ३४ कोटी रुपयांची  पाच गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना मंजूर 

residentional photo
residentional photo

नामपूर  :  नामपूर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेन्तर्गत सुमारे चौतीस कोटी रूपयांची नामपूरसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नामपूरसह आसखेडा, जायखेड़ा, नळकस व सारदे या पाच गावांना योजनेचा लाभ होईल. सदर योजनेन्तर्गत हरणबारी धरणातून थेट पाईप लाइनद्वारा शहरासाठी मुबलक शुद्ध पाणी उपलब्ध होणार असल्याने शहराचा पाणीप्रश्न सुटेल. अशी माहिती  माजी  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळे लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे यांनी दिली. 
                   गेल्या काही वर्षांपासून मोसम नदीपात्रातून होणारा बेसुमार वाळू उपसा, भूजल पातळीत झालेली कमालीची घट यामुळे उन्हाळ्यात दरवर्षी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी मोसम नदीकाठावरील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्याने शहराला तब्बल १२ ते १५  दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने नामपुरकारांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. यंदा तर ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी दाही दिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली होती. याबाबत सकाळने टंचाईकाळात वारंवार छायाचित्रासह भीषण  पाणीटंचाईचे वृत्त प्रसिद्ध केल्याने प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. मोसम नदीला पुरपाणी आल्यानंतर टंचाईची धग कमी झाली. 
               

मोसम खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शहराचा झपाट्याने विकास होत असून सुख सुविधांच्या उपलब्धतेमुळे परिसरात अनेक नववसाहती उदयास आल्या आहेत. शहराची लोकसंख्या सुमारे पस्तीस हजार इतकी आहे. आजही शहराला सुमारे ४५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जुन्याच पाणीपुरवठा योजनेचा आधार घ्यावा लागत आहे. येथील मोसम नदीपात्रात सीएसआर फंडाच्या माध्यमातुन सुमारे दीड कोटी रूपये खर्चुन केटीवेअर बांधण्यात आला आहे. परंतु हरणबारी धरणाचे आवर्तन संपल्यावर पुन्हा पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसते. त्यामुळे हरणबारी धरणातून थेट पाइपलाइन द्वारा पाणी आणण्याची योजना आखण्यात आली. याकामी ग्रामपंचायतीने सर्वेक्षणासाठी तीन लाख रूपये खर्चही केले आहेत. यानंतर २२ जुलैला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांनी मंत्रलयात प्रस्ताव दाखल केला. त्यानुसार शासनाचे कार्यसन अधिकारी अधिकराव बुधे यांनी सदर पाणीयोजनेस ३३ कोटी ८२ लाख रूपयांची प्रशासकीय मान्यता गुरुवारी ( ता. १९ ) दिली. याकामी खासदार डॉ. सुभाष भामरे, अण्णासाहेब सावंत यांच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेतली होती. निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष योजनेच्या कामास गती मिळेल.  
                राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेबाबत जिल्हाधिकारी यांनी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करावे, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाने दिल्या आहेत.  नामपूरला पाणीपुरवठा योजना कार्यान्वित व्हावी, यासाठी नामपूर बाजार समितीचे माजी संचालक डॉ शेषराव पाटील, बागलाणचे माजी आमदार दिलीप बोरसे, भाजपाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब सावंत, जिल्हा परिषद सदस्य कन्हू गायकवाड, पंचायत समिती सदस्या कल्पना सावंत, डॉ दिकपाल गिरासे, सरपंच किरण अहिरे,माजी सरपंच अश्पाक पठाण, जायखेड़ा सरपंच शांताराम अहिरे, आसखेडा सरपंच जया सावळा, नळकस सरपंच अंजना देवरे, सारदे सरपंच वैशाली देवरे, भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी, यांनी डॉ सुभाष भामरे यांच्याकडे पाठपुरावा केला.
 
दृष्टीक्षेपात पाणीयोजना अशी 
* सुरुवातीला एक वर्षे कंत्राटदार योजना राबविणार 
* योजनेसाठी आवश्यक भूसंपादन यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार 
* घरगुती नळजोडणीस प्राधान्य 
* पाण्याची बचत व्हावी, यासाठी मीटरनेच मिळणार पाणी 
* सहभागी गावांनी पाणी घेण्यास नकार दिल्यास ५० टक्के पाणीपट्टी वसूली होणार
* योजनेची देखभाल दुरुस्ती, यंत्रसामग्री नूतनिकरण यासाठी शासन निधी देणार नाही. 
* योजनेला विलंब झाल्यास संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराची राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com