esakal | हरभरा खरेदीचे नवीन निकष जाहीर; शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे !
sakal

बोलून बातमी शोधा

harbara

जळगाव जिल्ह्यात हरभरा उत्पादकता कमी केली असून एका शेतकऱ्याचा फक्‍त 25 क्‍विंटलच माल खरेदी केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात मोठी भर पडली असून त्यांचे कंबरडेच मोडले आहे. 

हरभरा खरेदीचे नवीन निकष जाहीर; शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे !

sakal_logo
By
राजू कवडीवाले

यावल (जळगाव) : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतीमालास मातीमोल भाव मिळत असून, शेतकरी नैसर्गिक आपत्तींसह कृत्रिम संकटांना तोंड देत असताना शासनाने हरभरा खरेदी केंद्रांवर जिल्हानिहाय उत्पादकतेचे नवीन निकष आज जाहीर केले आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात हरभरा उत्पादकता कमी केली असून एका शेतकऱ्याचा फक्‍त 25 क्‍विंटलच माल खरेदी केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात मोठी भर पडली असून त्यांचे कंबरडेच मोडले आहे.  

देशाचे अर्थक्षेत्र शेतीवर अवलंबून असून कोरोना विषाणूंच्या महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाउन आहे. या मुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेती उत्पादित मालास मातीमोल किंमत मिळत असल्यामुळे शेतकरीदेखील नाशवंत उत्पादित माल मिळेल त्या भावात विकून मोकळा होण्याच्या तयारीत असतात. गतवर्षी ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे रब्बी हंगाम चांगला होऊन भर निघेल अशा आशेवर होता, मात्र शेतकऱ्यांची स्वप्ने कोरोनाने उद्‌ध्वस्त करून त्यांना पुन्हा आर्थिक संकटाच्या खाईत लोटले. 

केळी संकटात 
केळी उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या दरानुसार दर मिळणे दुरापास्त झाले असून केळी व्यापारी माल कापण्यास येण्यास तयार नाहीत त्यामुळे केळी उत्पादित माल शेतातच सडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही शेतकरी उत्पादित माल तसाच सोडून देत आहेत. 

राज्य शासनाने सुरू केलेले हरभरा खरेदी केंद्रावर किमान आधारभूत किमतीत जिल्हानिहाय उत्पादकता निकष आज नव्याने जाहीर केले. त्यात जळगाव जिल्ह्यात पूर्वी असलेला प्रति हेक्‍टर14.50 क्विंटलची उत्पादकता प्रमाण आता आजपासून नव्याने 12.65 प्रतिहेक्‍टर क्विंटल असे जाहीर केले आहे. जळगाव जिल्ह्याचे हरभरा उत्पादकता प्रमाण कमी केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. नंदुरबार येथे प्रति हेक्‍टर 11.81क्विंटल, तर धुळे येथे जळगाव पेक्षा अधिक प्रमाणात 13.05 प्रतिहेक्‍टर क्विंटल अशी उत्पादकता आज जाहीर झाली. आज अखेर ज्या शेतकऱ्यांची हरभरा खरेदी केंद्रावर मोजणी झाली असेल ती 14.50 क्विंटल प्रति हेक्‍टर प्रमाणे झाली आहे. मात्र उद्या (ता. 18) पासून नवीन जाहीर झालेल्या पत्रकानुसार म्हणजेच 12.65 क्विंटल प्रति हेक्‍टर याप्रमाणे मोजणी होणार आहे. येथील हरभरा खरेदी केंद्रावर आज अखेर एकूण 787 शेतकऱ्यांनी सुमारे 11 हजार क्विंटल हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. आतापर्यंत केवळ 135 शेतकऱ्यांची हरभरा मोजणी झाली आहे. 655 शेतकरी अद्याप हरभरा मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव का. गो. वळवी यांनी आज हे सुधारित उत्पादकता परिपत्रक काढले. 

जिल्हानिहाय हरभरा हेक्‍टरी प्रमाण क्‍विंटलमध्ये 
ठाणे (7.01), पालघर (7.28), रायगड (4.18), रत्नागिरी (4.78), सिंधुदुर्ग (0), नाशिक (8.21), अहमदनगर (9.90), पुणे (9.09), सोलापूर (7.92), सातारा (9.38), सांगली (7.80), कोल्हापूर (9.16), औरंगाबाद (9.62), जालना(10.58), बीड (11.56), लातूर (11.29), उस्मानाबाद (8.05), नांदेड (17.08), परभणी (8.68), हिंगोली (9.85), बुलडाणा (14.12), अकोला (13.06), वाशीम (8.47), अमरावती (14.43), यवतमाळ(18.42), वर्धा(9.29), नागपूर (10.85), भंडारा (6.17), गोंदिया(4.70), चंद्रपूर (8.99), गडचिरोली (4.28)