वय वर्ष 103...कार्य मात्र तरूणांनाही लाजविणारे 

devman choudhary
devman choudhary

चुंचाळे (ता. यावल) : माणूस तरुण वयात असताना कोणतीही जबाबदारी अगदी सहज पेलू शकतो. कारण त्याला शरीर साथ देऊन, तरुणाईचाही एक वेगळाच 'जोश' त्यांच्याकडे असतो. परंतु एखादा वयोवृद्ध व्यक्ती वयाची शंभरी ओलांडून सुध्दा तरुणाईला लाजवेल, असेच अगदी शिस्तीने व जबाबदारीने आणि आपल्या पदाची जाणीव ठेवत सामाजिक कार्य करत आहे. ही बाब सर्वांसाठी प्रेरणादायी व दीपस्तंभासारखी आहे. तथापी वयाने म्हातारे परंतु कर्तुत्वाने 'तरुण' अशी ही कोण व्यक्ती असेल? होय, ती म्हणजे साकळी (ता. यावल) येथील पीक संरक्षण सोसायटीचे विद्यमान चेअरमन देवमन सिताराम चौधरी. 

देवमन चौधरी त्यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात सन 1918 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात झाला आहे. त्या काळातील त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीनुसार व शिक्षणाची सोयी नसल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही. मात्र, व्यवहारासाठी वाचता- लिहिता यावे म्हणून त्यांनी दोन महिने प्रौढ शिक्षण वर्गात शिक्षण घेतले व त्यांनी वाचायला -लिहियला शिकून स्वतःची सही करायला लागले. पत्नी, चार मुले, दोन मुली अशी सदस्य संख्या असलेल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनी सुरूवातीला गावातील पिक संरक्षण संस्थेत 'रखवालदार' म्हणून अल्प मानधनावर काम केले होते. नंतरच्या काळात मुलांचे शिक्षण व इतर प्रपंचाने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक भार वाढल्याने त्यांनी शेती करणे सुरु केले. 

गावात "बाबा' म्हणूनच प्रचलित 
गावात त्यांना सर्वत्र 'बाबा' म्हणूनच ओळखतात. त्यांचे आजचे वय जवळपास 103 वर्ष असून, गावातील सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती आहेत. साकळी पीक संरक्षण सोसायटीच्या सन 2015 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत देवमन चौधरी हे संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले होते. तसेच सध्या त्यांच्याकडे 5 जुलै 2019 पासून चेअरमनपदाची जबाबदारी आहे. वयाची शंभरी पार केलेली असतानासुद्धा श्री. चौधरी हे चेअरमनपदाची जबाबदारी धडाडीने व संस्थेच्या हिताशी बांधीलकी ठेवत पार पाडीत आहे. 

शेताच्या बांधावर जावून देतात न्याय 
शेतकऱ्यांची तक्रार निवारण करण्यासाठी शेती बांधावर जाऊन भेट देऊन निराकरण करणे, संस्थेच्या कारभारावर तसेच शेतात रखवाली करणाऱ्या रखवालदारांवर लक्ष ठेवणे. शेतकऱ्यांच्या भेटी घेणे व त्यांच्याशी विचारपूस करून समस्या समजून घेणे व संस्थेच्या नियमानुसार सोडवण्याचा प्रयत्न करणे. शेती पिकांच्या चोरीबाबत पोलिस प्रशासनाला संस्थेच्यावतीने तक्रार करणे. यासह संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष देणे एवढ्या जबाबदऱ्या श्री. चौधरी हे आपल्या वयाचा विचार न करता, व्यवस्थितपणे पार पाडीत असतात. श्री. चौधरी हे नातू, पणतूचे धनी असून, त्यांचा एक मुलगा दिनकर चौधरी हे ग्रामपंचायत सदस्य असून इतरही मुले सामाजिक कार्यात सक्रिय असून आपल्या व्यवसायात व्यस्त आहे. ही बाब आजच्या तरुण पिढीसाठी स्फूर्तिदायी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com