Dhule Marathon 2023 : मॅरेथॉनमुळे सकारात्मक विचारांना संजीवनी! अभूतपूर्व प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Marathon 2023

Dhule Marathon 2023 : मॅरेथॉनमुळे सकारात्मक विचारांना संजीवनी! अभूतपूर्व प्रतिसाद

धुळे : जिल्ह्यात न भूतो न भविष्यति, असा एक धुळे मॅरेथॉन- २०२३ हा उपक्रम राबविला गेल्याचे प्रशंसोद्‌गार खुद्द जिल्हावासियांच्या मुखातून उद्धृत होत आहेत. मॅरेथॉनला केवळ पाच हजार स्पर्धक धुळेकरांचा प्रतिसाद अपेक्षित असताना तो थेट पाच ते सहा पटीने लाभल्याने अभूतपूर्व असे यश मिळाले.

त्यामुळेच या स्पर्धेनंतरचे कवित्व अजूनही गायले जात असून ते विस्मरणात जातील असे वाटत नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पदभारानंतर अल्पावधीत या मॅरेथॉन स्पर्धेसाठी घेतलेला पुढाकार सकारात्मक विचारांना (पॉझिटिव्ह वेव) संजीवनी देणारा ठरला आहे. (Marathons revive positive thoughts Unprecedented response Dhule Marathon 2023)

पोलिस कवायत मैदानावर पाच फेब्रुवारीला झालेला मॅरेथॉनोत्सव हा लोकोत्सवच ठरला. या मैदानासह स्पर्धेच्या मार्गावर अर्थात आग्रा रोडवर २५ हजारांवर स्पर्धकांसह एकवटलेले धुळेकर प्रेक्षक अक्षरशः जलसा करत होते.

एरवी कधीही असा ओसंडून वाहणारा उत्साह, आनंद कुणी पाहिला नव्हता, अशा असंख्य धुळेकरांच्या प्रतिक्रिया अद्याप उमटत आहेत. धुळे मॅरेथॉन- २०२३ ही स्पर्धा संस्मरणीय तर झालीच, शिवाय ती जिल्ह्याच्या वैभवातील एक सोनेरी पान ठरली आहे.

पाच फेब्रुवारीला पहाटे साडेचार ते सकाळी दहापर्यंत हा ऐतिहासिक लोकोत्सव प्रत्येकाने डोळ्यात साठवला आणि सेल्फीद्वारे मनामनांवर कोरला. यानिमित्ताने धुळेकरांची अभिरुची जिल्हा पोलिस अधीक्षक बारकुंड यांच्या रूपाने जिल्ह्याला उमगली आणि सकारात्मक विचारांना संजीवनी मिळाली हे या स्पर्धेचे यश म्हणावे लागेल.

मॅरेथॉनची ताकद उमगली

‘सकाळ माध्यम समूहा’नेही या मॅरेथॉन स्पर्धेला एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयासह एक्झिक्युटिव्ह वर्किंग कमिटी आणि कौतुकास पात्र ठरणाऱ्या दानशूरांनी ऐतिहासिक कळस रचला.

सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा ग्लोबल होण्यासाठी टेक्नोसॅव्ही अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनीही मेहनत घेतली.

सर्व जाती- धर्मात खेळीमेळीचे, एकोप्याचे वातावरण निर्माण करण्याची ताकद क्रीडा प्रकारात असते. ते धुळे मॅरेथॉन स्पर्धेने सिद्ध केले. ते ओळखूनच जिल्हा पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी यशस्वी पाऊल उचलले. त्यामुळे सकारात्मक विचारांसह अभूतपूर्व चैतन्याची लाट अनुभवास मिळाली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

दृढ समन्वय फलदायी

प्रमुख सरकारी यंत्रणा, सेवाभावी संस्था व मान्यवरांनी मनापासून या लोकोत्सवात नोंदविलेला सहभाग वाखाणण्याजोगा होता. त्यांच्यातही माणूस असतो हे जनमानसाला दर्शविण्यात, तसेच समाज घटकांसह पोलिसांमधील अंतर कमी करण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक बारकुंड यांना एक वेगळे यश मॅरेथॉन स्पर्धा देऊन गेली.

त्यामुळेच आबालवृद्ध ही मॅरेथॉन स्पर्धा ऐतिहासिक ठेवा ठरल्याची प्रतिक्रिया देतात. मॅरेथॉनचे अनोखे वैशिष्ट म्हणजे स्पर्धा आपली म्हणून सर्व धावले. यात जिल्हा पोलिस अधीक्षक बारकुंड यांच्यामुळे पोलिस, महसूल, महापालिका, जिल्हा परिषद, क्रीडा कार्यालयाची एकत्रित गुंफण झाली.

तशीच ती समाजातील अभिरुचीसंपन्न मान्यवर, संस्था, क्लब, दानशूरांमध्येही झाली. असा दृढ समन्वय भविष्यात असाच टिकून राहिला तर धुळ्यातील अनेक समस्यांचे ठोस निराकरण झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास सर्वसामान्यांमध्ये उंचावला आहे.

प्रशासनबाह्य काही घटकांनी धुळेकरांची नेमकी अभिरुची काय हे मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त ओळखून पावले टाकली तर विकासाबाबत परिवर्तनाला चालनाही मिळू शकेल.

‘लेटस्‌‌ बी पॉझिटिव्ह यार’

मॅरेथॉन स्पर्धेतील सहभागाच्या संख्येबाबत काही टीका झाल्यात. प्रत्यक्षात ३० हजारांवर धुळेकरांनी ‘लेटस्‌‌ बी पॉझिटिव्ह यार’, असा संदेश एकमेकांना देत मॅरेथॉनोत्सवात स्वयंस्फूर्तीने सहभाग तर नोंदविलाच, शिवाय विकसनशील धुळ्याच्या टीकेचे धनी होण्यापेक्षा चांगुलपणाचे वाहक बना, असा सल्ला अभूतपूर्व प्रतिसादातून टीकाकारांना दिल्याचे मानले जाते

टॅग्स :DhuleMarathon