Dhule News : शास्ती माफी योजनेला महापालिकेतर्फे 28 पर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Officers-employees and property owners of Municipal Corporation while proceeding in connection with payment of property tax in Lok Adalat in District Court.

Dhule News : शास्ती माफी योजनेला महापालिकेतर्फे 28 पर्यंत मुदतवाढ

धुळे : मालमत्ता करावरील शास्ती (दंड) शंभर टक्के माफीच्या योजनेला महापालिकेतर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. १२ ते २८ फेब्रुवारी असा हा मुदतवाढीचा कालावधी आहे.

दरम्यान, प्रथम टप्प्यातील शास्ती माफी योजनेत शेवटच्या दिवशी (ता.११) तब्बल एक कोटी ८२ लाख रुपये वसुली झाली. शास्ती माफी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सहा दिवसात साडेतीन ते चार हजारावर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला. (shista maafi scheme extended till 28 by Municipal Corporation Dhule News)

मालमत्ता कर थकबाकी वसुलीच्या अनुषंगाने तसेच थकबाकीदारांवरील दंडाचा बोजा कमी करून त्यांना मालमत्ता कर अदा करता यावा यासाठी महापालिका आयुक्तांनी मालमत्ता करावरील शास्ती शंभर टक्के माफीची योजना घोषित केली.

त्यानुसार ६ ते ११ फेब्रुवारी या सहा दिवसांसाठी ही योजना होती. या योजनेचा काही थकबाकीदारांनी लाभ घेतला. ११ फेब्रुवारीला लोकअदालतमध्येही योजनेंतर्गत थकबाकीदारांनी कर अदा केला.

योजनेचा शेवटचा दिवस असल्याने महापालिकेसह जिल्हा न्यायालयातील लोकअदालतमध्ये कर अदा करण्याची सुविधा उपलब्ध होती. लोकअदालतीच्या ठिकाणी करमुल्य निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाट, वसुली अधीक्षक मधुकर निकुंभ, शिरीष जाधव यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शेवटच्या दिवशी सायंकाळपर्यंत एक कोटी ३८ लाखावर मालमत्ता कर वसुली झाली. दरम्यान, ऑनलाइन भरणाही सुरू होता. त्यामुळे रात्री बारापर्यंत कर वसुलीचा हा आकडा एक कोटी ८२ लाखापर्यंत गेला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

दरम्यान, योजनेच्या सहा दिवसात साडेतीन ते चार हजारावर थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेत कर अदा केला. यातून महापालिकेच्या तिजोरीत चार-साडेचार कोटी रुपये जमा झाल्याचा अंदाज आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून वसुलीची जुळवाजुळव सुरू होती, त्यामुळे अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही.

२८ पर्यंत मुदतवाढ

दरम्यान, महापालिका आयुक्तांनी शंभर टक्के शास्ती माफी योजनेला मुदतवाढ दिली आहे. यानुसार १२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान मालमत्ता कर थकबाकीदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

योजनेचा लाभ घेताना काही अटी-शर्ती आहेत. त्या अशा : यापूर्वी शास्तीची सर्व रक्‍कम अदा केलेल्या मालमत्ताधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच, योजनेंतर्गत कोणत्याही स्वरूपाचा परतावा दिला जाणार नाही,

या योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा करणे आवश्यक राहील, मालमत्ता करासंबधी न्यायालयात दावा प्रलंबित असल्यास प्रथमतः: सदर दावा न्यायालयातून काढून घेऊन त्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर शास्ती माफी योजनेचा लाभ घेता येईल.

नंतर जप्ती कारवाई

शास्ती माफी योजनेत शंभर टक्के शास्ती माफ करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीदारांनी मालमत्ता कर अदा करणे अपेक्षित आहे. या योजनेलाही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर मात्र, नंतर जप्तीची धडक कारवाई करण्यात येणार आहे.

मनपाचे जप्ती पथक या योजनेच्या कालावधीदरम्यानच थकबाकीदारांकडे जाणार असून त्यांना योजनेचा लाभ घेऊन आपल्याकडील कर भरण्याची विनंती करण्यात येईल. संबंधितांनी प्रतिसाद दिला तर योजनेपर्यंत त्यांना मुभा दिली जाईल अन्यथा जप्तीची कारवाई करू असे अधिकाऱ्यांनी सांगितले.