पत्रिका छापल्या, कार्यालय ठरलं अन्‌ थांबली लग्नं

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

आयुष्याच्या नव्या वळणावर वधू-वरांनी आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगविण्यास सुरवात केली. लग्न जमताच निमंत्रणपत्रिका छापल्या... मंगल कार्यालय ठरले. पण अशातच, नोटाटंचाईचे विघ्न आल्याने लग्ने थांबली. खर्चासाठी लागणाऱ्या पैशांपासून ते लग्नासाठी घ्यावयाच्या पैशांसाठीच्या निर्बंधांमुळे वधू-वर माता-पित्यांच्या डोकेदुखीमध्ये भर पडली असून, यंदाच्या लग्नसराईचा बॅंड वाजलाय. शक्‍यतो व्यवहार धनादेश अथवा ऑनलाइन, ई-बॅंकिंग, कार्ड स्वॅप करून करा, असा डिंगोरा पिटला जात असतानाच लगीनघरातील अन्‌ लग्नसराईशी निगडित असलेल्या व्यवस्थांपुढे उभ्या राहिलेल्या अडचणींच्या डोंगरांचा आढावा घेतलाय, ‘सकाळ’चे बातमीदार नरेंद्र जोशी, अरुण मलाणी, कुणाल संत, हर्षदा देशपांडे, युनूस शेख यांनी...

...अन्‌ जश्‍ने-शादी लांबणीवर  
नाशिकमधील वडाळा रोड भागातील अनिस शेख यांचे पुत्र साहिलचे लग्न १ जानेवारीला करण्याचे ठरले. लग्नपत्रिका छापायला देण्यापासून ते मंगल कार्यालयात ‘जश्‍ने-शादी’ करण्याचे निश्‍चित झाले. स्वागत समारंभासाठी लॉन्सचे बुकिंग केले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर घरातील गंगाजळीचा अंदाज घेतल्यावर अनिसभाईंना पाचशे-हजाराच्या नोटा असल्याचे आढळून आले. सरकारने जुन्या नोटा भरण्यासाठी मुदत दिली असली, तरीही बॅंकांसह एटीएमपुढे असलेल्या भल्या मोठ्या रांगांमधून नोटा भरण्यासह त्या काढण्यापर्यंत लग्नाचा मुहूर्त टळण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसल्याने भाईंनी पुत्राच्या ‘जश्‍ने-शादी’साठी १ जानेवारीऐवजी आता २५ जानेवारीचा दिवस निश्‍चित करत स्वागत समारंभासाठी प्रजासत्ताक दिन ठरवलाय.

उसनवारीपेक्षा लग्नच ढकलले पुढे 
गंगापूर रोड भागातील आवारे कुटुंबीयांनी कन्येचे लग्न करण्याचे ठरविले. डिसेंबर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शुभमंगल करण्याची कुटुंबीयांची इच्छा होती. पण आता नोटाबंदीने उठलेले वादळ शमेपर्यंत लग्न न केलेले बरे या निर्णयाप्रत कुटुंबीय पोचलेत. अर्थात त्यामागे बिघडलेले अर्थकारण हे एक कारण आहे. उसनवारीवर लग्नाची मुहूर्तमेढ रोवणे कुटुंबाला रुचलेले नाही. कन्येची आई सविता (नाव बदले आहे) यांनी वरसंशोधन सुरू केल्याचे सांगत प्राप्त परिस्थितीत आम्ही एप्रिल-मेपर्यंत थांबण्याचे ठरविल्याची माहिती दिली.

डिसेंबरऐवजी फेब्रुवारीत लग्नसोहळा
काशीनाथ पाटील यांनी कन्येचे लग्न मुंबईत करण्याचे ठरविले. पण तिथले हॉल बुकिंग, खरेदी अशांवरील खर्च अडीच लाखांत भागविणे शक्‍य नसतानाच कन्यादानासाठीच्या भेटवस्तूंसाठीच्या रोख रकमेचे काय करायचे, असा प्रश्‍न कुटुंबीयांपुढे तयार झाला. मग काय करायचे म्हणून लग्नाची तिथी डिसेंबरऐवजी फेब्रुवारीमध्ये घेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.

तुलसीविवाहानंतर लग्नाचा धुमधडाका सुरू होणार होता. नेमक्‍या अशा लग्नसराईच्या काळात नोटाबंदीचा निर्णय घेतला अन्‌ पैशांच्या व्यवस्थापनाने प्रश्‍नांची मालिका तयार झाली. सीमंतीपूजन, गोंधळ अशा विधींना द्यावे लागणारे पैसे, घरी आलेल्या पाहुण्यांचा रोजचा खर्च, दूरवरच्या पाहुण्यांसाठी द्यावी लागणारी वाहने अशा पैशांचे काय करायचे, या प्रश्‍नाने विशेषतः वधूपित्याला ग्रासले आहे. 

४० टक्के बुकिंग रद्द
नोटाबंदीच्या निर्णयानंतर ऐन लग्नसराईमध्ये लॉन्सह मंगल कार्यालयांचे बुकिंग ४० टक्‍क्‍यांपर्यंत रद्द झाले आहे. त्यामुळे कोट्यवधींचा फटका संचालकांना बसला आहे. गेल्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्याने अन्‌ आता नोटाबंदीमुळे या व्यवसायाचे अर्थकारण कोलमडले आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा लग्नांचे मुहूर्त अधिक असल्याने गेल्या वर्षी बसलेला दणका यंदा भरून काढण्याची संधी लॉन्ससह मंगल कार्यालयांच्या संचालकांना चालून आली होती. त्यामुळे अनेकांनी कर्जे काढून लॉन्स-मंगल कार्यालयांमध्ये सुविधा अद्ययावत करत सुधारणा केल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या तीन महिन्यांमध्ये अधिक मुहूर्त असल्याने या महिन्यापूर्वीच अनेकांनी शहरातील लॉन्स-मंगल कार्यालये आगाऊ रकमा देऊन बुक केली होती. नोटाबंदीमुळे बुकिंग रद्द होण्यासह केटरर्स, घोडेवाले, फूलविक्रेते, बॅंड, मंडप-स्पीकरवाले, सजावटकारांना व्यवसायाच्या भवितव्याच्या चिंतेने ग्रासले आहे. लग्नसोहळ्यातील हौसमौज म्हणून वर असो की वधू कुटुंबीयांकडून खर्चाचा हात आखडता घेतला जात नाही. पण लग्नपत्रिका छापून मुहूर्तावर सोहळ्याचा धुमधडाका उडवून देण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबीयांना आता मात्र स्टेज सजावट, डीजे, घोडा, भोजनातील मेन्यू यावर होणाऱ्या खर्चात जवळपास निम्म्याने हात आखडता घेतल्याचे लग्नसराईचा धांडोळा घेतल्यावर आढळून आले आहे.

आनंदोत्सवासाठी अटी-शर्तींच्या सीमारेषा
लग्नसोहळ्यात रोखीने खर्चासाठी रोकड उपलब्ध करून देण्याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने अटी-शर्ती घातल्या आहेत. या संदर्भात काल परिपत्रक जारी केले आहे. ग्राहकाने धनादेश, धनाकर्ष, नेट बॅंकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड आणि अन्य माध्यमातून पैसे अदा करावेत याबद्दल बॅंकांनी समुपदेशन करण्याच्या सूचना आर.बी.आय.ने दिल्या आहेत. हे कमी काय म्हणून बॅंकेने या संदर्भातील सर्व पुराव्यांचे जतन करावे, आवश्‍यकता भासल्यास तपासणी करावी, याही सूचनांचा समावेश आहे.

लग्नासाठी पैसे काढण्याचे हे आहेत नियम
अडीच लाखांपर्यंतच रोख रक्‍कम बॅंक खात्यातून काढता येईल. तसेच ही रक्‍कम ८ नोव्हेंबरपूर्वीपासून बॅंक खात्यात जमा असावी. 
३० डिसेंबरला अथवा त्यापूर्वी लग्न होणार असलेल्यांनाच पैसे  मिळतील. 
‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केलेल्या खात्यातूनच पैसे काढता  येतील.
आई-वडील अथवा वधू-वर ही रक्‍कम काढू शकतात. (पालक अथवा वधू-वर या दोघांपैकी एकालाच रक्‍कम काढता येईल.)
बॅंकेमध्ये खाते नसलेल्या व्यक्‍तीलाच या रकमेतून रोखीने पैसे अदा करता येतील.

पैसे हवे असल्यास करायची पूर्तता 
विहित नमुन्यातील अर्ज.
लग्न होत असल्याचा पुरावा (उदाहरणार्थ ः लग्नपत्रिका,लॉन अथवा सभागृह, केटरर्सला आगाऊ रक्‍कम अदा केल्याची पावती).
बॅंक खाते नाही आणि ज्यांना रोखीने पैसे द्यायचे आहेत अशा संभाव्य व्यक्‍ती, संस्थांची सविस्तर यादी.

काय येतील अडचणी?
डिसेंबरमध्ये मुहूर्त असलेल्यांनी ८ नोव्हेंबरपूर्वीच रक्‍कम बॅंक  खात्यात निश्‍चितच जमा केलेली नसेल, अशा व्यक्‍तींना काय पर्याय उपलब्ध आहे? 
वधू-वर, त्यांचे पालक आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतील  की प्रत्येक गोष्टीच्या नोंदी ठेवतील?   
पैसे अदा करीत असलेल्या व्यक्‍तीने आपले खाते नसल्याची खोटी माहिती दिली, तर त्यास जबाबदार कोण?
वधू-वर, त्यांचे पालक लग्नाची तयारी करतील की सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करत बसतील?
पाहुण्यांच्या स्वागतासाठी ऐनवेळी होणाऱ्या खर्चांचा तपशील ठेवणार कसा?
खरेदीनंतर छापल्या जाणाऱ्या लग्नपत्रिकांचे करायचे काय?
पाहुण्यांसाठीचा भोजन खर्च आणि घरगुती कार्यक्रम हे दोन हजारांत कसे भागवायचे? 
लग्नातील इतर कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या पैशांचे काय? (मेंदी, जागरण, गोंधळ, सीमंतीपूजन, स्वागत समारंभ) 

नोटाबंदीच्या निर्णयाने धंद्यावर ३० ते ४० टक्‍के परिणाम झाला आहे. लग्नतिथी असूनही पैशांच्या अभावाने अनेकांनी लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलले आहेत. त्यामुळे आमच्या व्यवसायाला ब्रेक लागला आहे.
-गुलजार कोकणी,  साहिल लॉन्स 

आमच्याकडील बुकिंग रद्द करून अनेकांनी पैशांची मागणी केली आहे. तीन महिन्यांसाठी बुकिंग झाले होते. त्यातील निम्मे बुकिंग रद्द झाल्याने आर्थिक समीकरणे कोलमडली आहेत. गेल्या वर्षी कुंभमेळा आणि आता नोटाबंदीचा फटका बसला.
-गंगाधर बुरकुले, संचालक, बुरकुले लॉन्स ॲण्ड हॉल

नोटा बंद झाल्याने बुकिंग रद्द होतच आहेत. त्यामुळे आमच्यावर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांचा धंदा ठप्प झाला आहे. सजावट, बॅंडबाजा यावर लाखो रुपयांचा खर्च करणारे आता  कमी खर्चात लग्न लावण्याची मागणी करीत आहेत.  
-सुनील चोपडा,  संचालक, चोपडा लॉन्स 

गणेशोत्सवापासून व्यवसायाला घरघर लागली. लग्नसराईत मागची कसर भरून निघेल असे वाटले होते. मात्र नोटाबंदीमुळे लग्न पुढे ढकलले जात आहे. आम्हाला मागेल त्या भावात बॅंड, डीजे, ऑर्केस्ट्रा उपलब्ध करून देण्याशिवाय पर्याय नाही. काही ग्राहक आगाऊ रक्‍कम देत आहेत. 
-रितेश इंगळे, डीजे व्यावसायिक

लग्नसराईसाठी वादकांना बाहेरून बोलावले. पण आता मागणी नसल्याने घरबसल्या वादकांवर खर्च करण्याखेरीज पर्याय नाही. आमचा व्यवसाय गेल्या वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्‍क्‍यांनी घटला आहे.
-अशोक मोगरे,  बॅंड व्यावसायिक

लग्नसोहळ्यातील यजमानांनी आमंत्रितांच्या संख्येत घट केली आहे. त्यासंबंधीचे निरोप मिळत आहेत. खरे म्हणजे, आम्हाला भाजीपाल्यासह इतर पदार्थ घेण्यासाठी रोखीने व्यवहार करावा लागतो. रोख पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पैसे द्यायचे कोठून?
-संजय गोंदेकर, मुहूर्त केटरर्स 

लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्याने ऐन लग्नसराईत घरी बसण्याची वेळ आली आहे. आमची दक्षिणा ठरलेली असते. ती यजमान देणारच असतात. त्यात कोणी कमी-जास्त करीत नाही. मात्र सुटे नसल्याने नंतर देतो म्हटल्यावर काही बोलता येत नाही. साखरपुड्यापासून मुंज, सत्यनारायणपूजाही कमी होणार नाही.
-रमेश जोशी, पुरोहित

सजावटीपासून ते नवरदेव-नवरीच्या हौसेमौजेसाठीच्या फुलांची मागणी येणे जवळपास थांबले आहे. परिणामी फुलबाजारात शांतता पसरली आहे. आम्हाला आता पूजाविधीसह अन्य छोट्या कार्यक्रमांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे, तर कारागिरांना मजुरी देणे महागात पडू लागले आहे.
-अनिल कमोद, फुलविक्रेते

लग्नसराईमध्ये चाळीस ते पन्नास ऑर्डर मिळायच्या. यंदा नोटाबंदीमुळे ओढवलेल्या आर्थिक आपत्तीने आतापर्यंत १५ ऑर्डर रद्द झाल्या आहेत. आता हातात केवळ पाच ऑर्डर आहेत. लोक लग्नतिथी पुढे ढकलू लागल्याने गिऱ्हाईक मिळेल की नाही, असा प्रश्‍न कायम आहे.
-अरुण परदेशी, घोडेवाला

Web Title: marriage card hailing, office moments, and stopped marries