प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

नाशिक - दोन दिवसांपूर्वी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच्या मृत्यूमागील कोडे उलगडले आहे. प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्यामुळेच तिने आत्महत्या केली, अशी फिर्याद तिच्या आईने दिली आहे. पोलिसांनी संशयित प्रियकरासह त्याची बहीण व मेहुण्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

निर्मला शार्दुल (वय २६, रा. जाधव निवास, स्वामी विवेकानंदनगर, मखमलाबाद, नाशिक) या विवाहितेने शनिवारी (ता. १९) विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केली होती. या प्रकरणी निर्मलाची आई लीलाबाई जाधव यांनी संशयित प्रियकर मुकेश बकुरे (रा. फुलेनगर, पंचवटी), त्याची बहीण भारती थोरात, मेहुणे राजू थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निर्मल शार्दुल हिचा २०११ मध्ये घाटकोपर येथील नीलेश शार्दुल यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना चार वर्षांची मुलगीही आहे; परंतु त्यांचा वाद झाल्याने काही महिन्यांपासून ती मखमलाबाद येथे माहेरी राहत होती. यादरम्यान, तिचा बालपणीचा मित्र संशयित मुकेश बकुरे याच्याशी प्रेमसंबंध आले. मुकेशने तिला विवाह करण्याचे आमिष दाखविले होते. परंतु नंतर त्याने विवाह करण्यास नकार दिला. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. 

तिने मुकेशविरोधात पंचवटी पोलिसांत लैंगिक अत्याचाराची तक्रारही दिली होती. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकही करण्यात आली होती. मात्र, तरीही त्याने निर्मलाशी विवाह करण्यास नकार दिल्याने त्यातूनच तिने शनिवारी (ता. १९) राहत्या घरी विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांत तिघा संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश बकुरे याला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. आर. पाटील तपास करीत आहेत.

Web Title: married women to suicide due to boyfriend refusing marriage