कानळद्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

पतीने ठार मारून लटकविल्याचा आरोप; संतप्त माहेरवासीयांकडून जावयास चोप

जळगाव - कानळदा (ता. जळगाव) येथील विवाहिता मनीषा भिलाणे (वय २५) हिने गळफास घेतल्यानंतर तिचा मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेची माहिती कळाल्यावर वाकटुकी (ता. धरणगाव) येथून माहेरची मंडळी मुलीकडे दाखल झाली.

पतीने ठार मारून लटकविल्याचा आरोप; संतप्त माहेरवासीयांकडून जावयास चोप

जळगाव - कानळदा (ता. जळगाव) येथील विवाहिता मनीषा भिलाणे (वय २५) हिने गळफास घेतल्यानंतर तिचा मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेची माहिती कळाल्यावर वाकटुकी (ता. धरणगाव) येथून माहेरची मंडळी मुलीकडे दाखल झाली.

त्यांनी तिच्या दारूच्या नशेत तर्रर्र पतीला बेदम झोडपले. वेळीच तालुका पोलिस व ग्रामस्थांनी जमावाच्या तावडीतून त्याची सुटका करीत पोलिस गाडीत टाकल्याने त्याचे प्राण वाचले. दरम्यान, कन्यारत्न झाले म्हणून मुलीचा छळ करून तिला ठार मारल्याचा आरोप विवाहितेच्या नातलगांनी केला व सासरच्या मंडळींच्या अटकेची मागणी करीत जिल्हा रुग्णालयातही गोंधळ घातला.

वाकटुकी येथील माहेर व भादली खुर्द (ता. जळगाव) येथील सासर असलेल्या मनीषा भिलाणेचा तीन वर्षांपूर्वी एस. टी. महामंडळातील कंडक्‍टर ज्ञानेश्‍वर बाविस्कर यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर काही दिवस सुखी संसारात गेले. एक वर्षापूर्वी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यापासून पत्नी मनीषाचा छळ करणे सुरू झाले. लग्नात दिलेले स्त्रीधन (सोन्याचे दागिने) मोडून पतीने केव्हाच दारूत उडविले. त्यामुळे बदलीच्या कामासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये आणावेत, यासाठी तिचा छळ सुरू होता. सासू-सासरे, अडावद येथील नणंद यांच्याकडून होणारा छळ व मानसिक त्रास असह्य झाल्याने पतीची लासलगावहून जळगाव डेपोत बदली झाल्यावर वाकटुकी येथे न राहता कानळदा येथे दोघे वास्तव्यास होते. तेथे सहा महिने उलटल्यावरही मनीषाला त्रास देणे सुरूच होते. त्यात पतीकडून दारूच्या नशेत होणारी सततची मारझोड आणि त्रास असह्य झाल्याने आजची दुर्दैवी घटना समोर आली. सकाळी पावणेबारापूर्वी कानळद्यात तीन नातेवाइकांच्या माध्यमातून मनीषाच्या माहेरी घटना कळविण्यात आली. 

पती घरातच सापडला झिंगत
मनीषाचे वडील पंडित धुडकू भिलाणे, आई सुनंदा, भाऊ सिद्धार्थ, सुमित यांच्यासह इतर नातेवाइक व कुटुंबीय वाकटुकीहून कानळदा येथे दुपारी बाराला दाखल झाले. मनीषाचा लटकलेला मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला. याचवेळी मनीषाचा पती ज्ञानेश्‍वर दारूच्या नशेत आढळून आल्याने नातेवाइकांनी त्याला जाब विचारत बेदम झोडपले. या घटनेची माहिती कळाल्याने तालुका पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक अवारी, राजेंद्र बोरसे, मगन मराठे कानळद्यात पोहोचले. संतप्त जमावाच्या तावडीतून ज्ञानेश्‍वरला सोडवत त्याला पोलिस गाडीत टाकून जळगावला हलविले.

पतीच्या खिशात दोरी
मनीषाचा मृतदेह राहत्या घरात किचनओट्याशेजारील दाराच्या चौकटीला लटकलेला होता. मृतदेहाचे पाय जमिनीला टेकतील अशा परिस्थितीत होते व शेजारी लाकडी स्टूल होता. त्यामुळे मुलीला गळफास देऊन नंतर दाराच्या चौकटीवर लटकविण्यात आल्याचा आरोप माहेरच्यांनी केला असून, मारहाणीत दोरीचा एक तुकडा पतीच्या खिशात मिळून आल्याने ठार मारून लटकविल्याची नातेवाइकांची खात्री झाली व संतापाचा उद्रेक झाला. 

सासरच्यांना अटकेची मागणी
सासू शारदा, सासरे दिलीप बुधा बाविस्कर यांच्यासह अडावद येथील नणंद यांना तत्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली. घटनेचे गांभीर्य आणि काल घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती नको म्हणून उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी स्वत: मुलीच्या नातेवाइकांसह पालकाची भेट घेत कारवाईचे आश्‍वासन दिले. 

कन्यारत्न झाले म्हणून छळ 
मनीषाला पहिलेच कन्यारत्न झाले म्हणून सासरच्यांकडून छळ सुरू झाला. संबंधित कन्येचा सहा डिसेंबरला पहिला वाढदिवस साजरा झाला.

वाढदिवशीही ज्ञानेश्‍वर दारूच्या नशेतच होता. कन्यारत्न झाले, माहेरहून बदलीसाठी पैसे आणावेत म्हणून अनेक दिवसांपासून तिचा सासरच्यांकडून छळ सुरू होता, तर पतीही सतत मारझोड करीत असल्याची माहिती नातेवाइकांनी पोलिसांना दिली असून, संबंधितांचे जबाब नोंदविण्यात आले.

Web Title: married women suspected death