बामखेड्याचा एकजण ‘पॉझिटिव्ह’ 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी आणखी एकाचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे शहाद्यातील उर्वरित सहा रुग्णांच्या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. आज जिल्ह्यातील सहा अहवाल आले. त्यात शहाद्यातील पाच रुग्णांचा दुसरा व तिसरा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याची माहिती शहादा प्रशासनाला प्राप्त झाली.

शहादा : बामखेडा (ता. शहादा) येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा ‘कोरोना’ अहवाल नाशिक येथे ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. तो किडनीच्या विकाराने त्रस्त असल्याने वडाळी, बामखेडा तसेच धुळे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. चार दिवसांपूर्वीच त्याला नाशिकला हलविण्यात आले होते. याबाबत तातडीने येथील प्रशासनाला कळविण्यात आले. त्यानंतर संपूर्ण बामखेडा गाव ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित करण्यात आले. प्रशासन सर्व उपाययोजना करीत असून, नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आज शहादा येथील पाच आणि अक्कलकुवा येथील एक, असे सहा रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

प्रशासनाला अहवाल येताच खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. याशिवाय, संबंधित व्यक्तीच्या निकटच्या लोकांचे ‘स्वॅब’ नमुने घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बामखेडा येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीला ‘कोरोना’ची लागण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला असून, खबरदारी म्हणून तो राहत असलेला मीरानगर भाग प्रशासनातर्फे ‘सील’ करण्यात आला आहे. 

संबंधित रुग्ण हा किडनी रोगाने त्रस्त असल्याचे समजते. उपचारासाठी तो शहादा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला नऊ मेस नाशिकला नेण्यात आले होते. त्यानंतर आज तेथे त्याची तपासणी केली असता, त्याचा ‘कोरोना’ अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने प्रशासन तातडीने गावात दाखल झाले. त्याच्या कुटुंबाचे, त्या व्यक्ती व कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची प्रशासनाद्वारे उशिरापर्यंत तपासणी करण्याचे काम सुरू होते. कुटुंबातील व्यक्तींचे ‘स्वॅब’ नमुने घेण्याचे काम सुरू आहे. त्यांना ‘होम क्वारंटाइन’ करण्यात येऊन ग्रामपंचायतीतर्फे पूर्ण गावात खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सारंगखेडा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, वडाळीचे आरोग्य अधिकारी डॉ. मोहने व त्यांच्या पथकासह पोलिसपाटील डॉ. योगेश चौधरी, सरपंच लीना चौधरी आदी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. 

शहाद्यातील पाच जण ‘कोरोना’मुक्त 

शहादा येथील पाच ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना आज रात्री उशिरा किंवा सकाळी घरी जाऊ देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरित एकाचा अहवाल प्रलंबित आहे. शहादा शहर आता शंभर टक्के ‘कोरोना’मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, बामखेड्याच्या एकाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर शहादा तालुक्यात ‘थोडी खुशी, थोडी गम’चे वातावरण आहे. ‘कोरोना’मुक्त झालेल्यांत तीन पुरुष (४०, ४४ आणि ४८ वर्षीय) आणि दोन मुलींचा (१२ आणि १५ वर्षीय) समावेश आहे. अक्कलकुवा येथील एका पुरुषाचा (५८ वर्षीय) समावेश आहे. 
शहादा शहरात २१ एप्रिलला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला. या ४२ वर्षीय तरुणासोबत त्याची आईसुद्धा ‘पॉझिटिव्ह’ होती. नजीकच्या अन्य सात जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहादा शहर हादरले होते. मात्र, प्रशासनाने तातडीने पावले उचलत नागरिकांनाही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करून कठोर कारवाईही केली. यातील पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र, मृताच्या आईचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने घरी सोडण्यात आले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी आणखी एकाचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे शहाद्यातील उर्वरित सहा रुग्णांच्या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. आज जिल्ह्यातील सहा अहवाल आले. त्यात शहाद्यातील पाच रुग्णांचा दुसरा व तिसरा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याची माहिती शहादा प्रशासनाला प्राप्त झाली. त्यामुळे शहाद्याची वाटचाल ‘ग्रीन झोन’कडे जात असल्याचे स्पष्ट आहे. उर्वरित एकाचा दुसरा व तिसरा अहवाल प्रलंबित आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marthi news nandurbar bamkheda one parcen positiv