वाढत्या तापमानाचा केळीला फटका

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

केळी उत्पादकांच्या बागांची तालुका व जिल्हा कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी समन्वयकांकडून पाहणी करण्यात येऊन ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी एप्रिलसाठी 33 हजार, तर मे महिन्यासाठी 41 हजारांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

शहादा : एप्रिल- मेमधील प्रतिकूल अतिउष्ण तापमानाचा केळी पिकाला फटका बसत आहे. बागांचे नुकसान होत असून, केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना फळपीक विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहादा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी नगरसेवक प्रा. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत पुढाकार घेतला आहे. 

शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत नमूद जिल्ह्यातील केळी पीक उत्पादकांना हवामान धोका व कालावधी लक्षात घेऊन प्रतिहेक्‍टरी नुकसानभरपाई दिली जाते. यासाठी शासनमान्य विमा कंपनीतर्फे शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सहाय्य केले जाते. शासनाच्या सूचनेनुसार, हिवाळ्याच्या कालावधीत सलग तीन दिवस आठ अंश व त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास प्रतिहेक्‍टरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाते. एप्रिलमध्ये सलग पाच दिवस 42 अंश वा त्यापेक्षा अधिक तापमान राहिल्यास प्रतिहेक्‍टरी 33 हजार रुपये आणि मेमध्ये सलग पाच दिवस 45 अंशांच्या वर तापमान राहिल्यास प्रतिहेक्‍टरी 41 हजारांची नुकसानभरपाई शासनमान्य विमा कंपनीकडून देणे बंधनकारक आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादन घेणाऱ्या शहादा, तळोदा व नंदुरबार या तालुक्‍यांतील त्या- त्या महसूल मंडळात एप्रिल व मे महिन्यातील तापमान अतिउष्ण असल्याने केळीबागांचे नुकसान झाले आहे. या केळी उत्पादकांच्या बागांची तालुका व जिल्हा कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी समन्वयकांकडून पाहणी करण्यात येऊन ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी एप्रिलसाठी 33 हजार, तर मे महिन्यासाठी 41 हजारांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 

रावेरच्या धर्तीवर भरपाई द्या 
प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील, विशेषत: रावेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाईचे दावे मंजूर करण्यात आले आहेत. त्याचअनुषंगाने शहादा, तळोदा व नंदुरबार या तालुक्‍यांतील केळी उत्पादकांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी तालुक्‍यातील शेतकरी शहाद्याचे नगरसेवक प्रा. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा व प्रयत्न करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marthi news nandurbar Rising temperatures hit bananas