मेहुणबारे- उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव 

दीपक कच्छवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव): "शेतकरी सुखी तर जग सुखी' असे आपण ऐकतो. गिरणा परिसरातील शेतकऱ्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. या संदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव): "शेतकरी सुखी तर जग सुखी' असे आपण ऐकतो. गिरणा परिसरातील शेतकऱ्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. या संदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. 

मेहुणबारेसह परिसराला गिरणा नदी वरदान ठरली आहे. त्यातच यावर्षी बेलगंगा साखर कारखाना सुरू होणार असल्याने तालुक्‍यात जवळपास 4  हजार हेक्‍टरवर उसाची लागवड झाली आहे. मागीलवर्षी कपाशीवर आलेल्या बोंडअळीच्या संकटातून शेतकरी बाहेर पडत नाही, तोच आता उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. उसाची हिरवी पाने चिकट होत असून त्यावर तपकिरी रंगांचे डाग दिसत आहेत. काही शेतात उसाची पाने करपणे सुरु झाली आहेत. हळूहळू तांबेरा रोगाचा फैलाव वाढताना दिसत आहे. वरखेडे भागातही या रोगाने डोके वर काढले आहे. बहुतांश शेतकरी उसाचे दुबार पीक खोडवा राखून ठेवतात. त्यावर खूप खर्च झालेला असतो. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी महागडी औषधे घेऊन विविध उपाययोजना केल्या. मात्र, काही एक फरक पडत नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. कपाशीचे पीक घेतले तर बोंडअळी आणि उसाचे घेतले तर तांबेरा रोग पडण्याची भीती यामुळे शेतात कोणते पीक घ्यावे अशा द्विधा मनःस्थितीतीत शेतकरी सापडले आहेत.

अशा आहेत उपाययोजना 
उसाच्या पिकाला नत्राची मात्रा वाढून त्याच्या प्रमाणाच्या शिफारशीनुसार द्यावी. जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. पानांवरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी "मॅन्कोझेब' अथवा "कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड' यांपैकी कोणतेही एक बुरशीनाशक 0.3 टक्के (3 ग्रॅम प्रती लिटर पाणी) या प्रमाणात घेऊन 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात, अशी उपाययोजना करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. 

उसावर पडलेल्या रोगासंदर्भात कृषी विभागातर्फे सर्व्हेक्षण केले जाईल. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी या विषयातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांना बोलावून लवकरच कार्यशाळा घेण्यात येईल. 
- अनिल येवले, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, चाळीसगाव

Web Title: mehunbare crop issue