बहाळला तरुण- तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पेरूच्या शेतात आज मध्यरात्रीच्या सुमारास तरुण व तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बहाळ (ता. चाळीसगाव) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, परिसर सुन्न झाला आहे. रितेश रामदास झोडगे (वय १७) व  सोनल कुंदन ढोले (वय १५, दोघे रा. बहाळ) अशी मृतांची नावे आहेत.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पेरूच्या शेतात आज मध्यरात्रीच्या सुमारास तरुण व तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बहाळ (ता. चाळीसगाव) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, परिसर सुन्न झाला आहे. रितेश रामदास झोडगे (वय १७) व  सोनल कुंदन ढोले (वय १५, दोघे रा. बहाळ) अशी मृतांची नावे आहेत.

दोघांच्या कुटुंबांची परिस्थिती सर्वसाधारण असून, रितेश हा कोळगाव (ता. भडगाव) येथे बारावीत शिकत होता. सोनल ढोले ही गावातील माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकत होती. काल (ता. २६) सोनल हिने आपल्या शाळेतील लेझीम पथकात भाग घेतला होता. कार्यक्रम संपल्यावर सोनल ही घरीच होती. रात्री बारापर्यंत घरात ती टीव्ही बघत होती. त्यामुळे असे काही घडेल, अशी कुणाला साधी कुणकूणही नव्हती.

दोघांनी संपविले जीवन
रितेश हा घरीच रात्री बारापर्यंत जागा होता. अचानक एकच्या सुमारास तो घराबाहेर पडला. वडील जागेच असल्याने त्यांनी रितेशला हटकले. मात्र शौचास जात असल्याचा बहाणा करून तो दुचाकी घेऊन घरातून गेला. परंतु अर्धा तास होऊनही मुलगा परत येत नसल्याने वडिलांनी त्याची शोधाशोध केली. पण तो कुठेच दिसला नाही. त्याचे कुटुंबीय घाबरलेल्या अवस्थेत त्याच्या शोधासाठी ग्रामस्थांसह गुढे रस्त्यालगत असलेल्या शेताकडे गेले. शेतात पेरूची बाग असल्याने बागेत घुसले असता रितेश व सोनल या दोघांनी पेरूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच एकच खळबळ उडाली. 

रितेश हा एकुलता मुलगा होता, तर सोनलही परिवाराची लाडकी होती. या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाट व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. 

बहाळ गावावर शोककळा
दोघांच्या आत्महत्येनंतर गाव सुन्न झाले असून, दोन्ही कुटुंबीयांचा एकच आक्रोश सुरू होता. दुपारी दीडला रितेशवर, तर तीनला सोनल हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार पृथ्वीराज कुमावत हे तपास करीत आहेत.

Web Title: mehunbare jalgaon news boy and girl suicide