दोन चिमुकलींसह तिघांचा बुडून मृत्यू

दोन चिमुकलींसह तिघांचा बुडून मृत्यू

मेहुणबारे/अमळगाव - जामदा (ता. चाळीसगाव) येथील दोन चिमुकलींचा जवळच असलेल्या जामदा धरणाच्या गेटजवळील पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना लक्षात आल्याने गावात एकच खळबळ उडाली. मृतांत एक चिमुकली ही हेंद्रुण (ता. धुळे) येथील रहिवासी आहे. दुसऱ्या एका घटनेत दोधवद (ता. अमळनेर) येथे मावशीकडे गेलेल्या जळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

जामदा येथील भोलेनाथ काकडे यांच्याकडे त्यांची बहीण छायाबाई नवसरे (रा. हेन्द्रुन, ता. धुळे) या माहेरी आल्या होत्या. त्यांना तीन मुली असून, यातील लहान मुलगी रितू आबा नवसारे (वय ४) व तिचा चुलत मामा वाल्मीक सुभाष काकडे यांची मुलगी भाग्यश्री काकडे (वय ३) या दोघी घराबाहेर अंगणात खेळत होत्या. खेळता खेळता त्या जवळच असलेल्या खजिना महादेव मंदिराजवळील पाटात धरणाच्या गेटजवळ डबक्‍यात आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास पडल्या. मात्र, आजूबाजूला कोणीच नसल्याने दोघी चिमुकलींचा बुडून मृत्यू झाला.

पाण्यावर तरंगत होते मृतदेह 
येथील पाटचारीतील डबक्‍यात भाग्यश्री व रितू या दोघी चिमुकलींचे मृतदेह पाण्यातून वर आले होते. त्या ठिकाणी राजेंद्र काकडे हे जात असताना त्यांना या दोघी चिमुकलींचे मृतदेह दिसले. ते पाहताच त्यांनी कंबरेपर्यंत असलेल्या पाण्यात उतरून दोघांचे मृतदेह बाहेर काढून घराकडे नेले. तेव्हा रितूची आई छायाबाई हिने ‘माझी रितू मला परत द्या’, असे म्हणत हंबरडा फोडला. त्यातील दुसरी चिमुकली भाग्यश्री ही आई- वडिलांची एकुलती मुलगी होती. त्यांचाही आक्रोश उपस्थितांचे मन हेलावणारा होता. रात्री नऊला दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आजी- बाबा यांची शेवटची भेट
भाग्यश्री हिची आजी चंद्रकलाबाई काकडे व बाबा सुभाष काकडे हे दुपारी चारला पंढरपूर जाण्यासाठी निघाले होते. जाण्यापूर्वी आजी- बाबा दोघा चिमुकल्यांना भेटून पंढरपूर जाण्यासाठी रवाना झाले होते. चाळीसगावपर्यंत पोहोचल्यानंतर नातीच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच आजी- बाबा गावी परतले. दुपारी चारला नातींची भेट शेवटची ठरल्याने त्यांनीही आक्रोश केला.

जळगावचा तरुण बुडाला
अमळगाव (ता. अमळनेर) - जळगाव येथील रहिवासी राहुल दिलीप कोळी (वय १७) हा दोधवद येथे आपल्या मावशीकडे आला होता. तो आज सायंकाळी पाचच्या सुमारास तापी नदीपात्रालगत शौचास गेला असता पाय घसरून नदीपात्रातील पाण्यात बुडाला. त्याला अमळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. या बाबत मारवड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुल कोळीला पाण्यातून काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे फक्त एकच परिचारिका व आरोग्यसेवक होते. डॉक्‍टर हजर नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com