फाळके स्मारकात मिनी फिल्मसिटी

फाळके स्मारकात मिनी फिल्मसिटी

नाशिक - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारलेल्या स्मारकाचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विकास केला जाणार असून, स्मारकात मिनी फिल्मसिटी उभारली जाणार आहे. त्याचबरोबर आनंदवली ते तपोवनदरम्यान गोदावरी तीरावर दशक्रिया विधीच्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. 

स्थायी समितीने महासभेला सादर केलेल्या अंदाजपत्रकात विकासाचा अकरा कलमी कार्यक्रमाचा समावेश करून नागरिकांना ‘अच्छे दिन’ दाखविण्याचा प्रयत्न केला. ८९ कोटींच्या अतिरिक्त कामांचा समावेश अंदाजपत्रकात केल्याचे सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्थायी समितीला १६५९.१७ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. स्थायी समितीने त्यात अकरा योजनांचा समावेश करून ८९ कोटींची वाढ केली. सभापती आहेर-आडके यांनी अंदाजपत्रक नगरसचिव विभागाला सादर केले.

त्यानुसार, ७ मार्चला अंदाजपत्रकीय सभा होण्याची शक्‍यता आहे. स्थायीने अंदाजपत्रकाचा आकडा वाढविताना कंपाउंडिंग चार्जेस, हार्डशिप प्रीमियम, होर्डिंग्ज व अनधिकृत बांधकामांच्या शुल्क वसुलीतून जमा बाजू धरली आहे.

दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या नूतनीकरणासाठी नऊ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. युवा धोरणासाठी दहा लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यात पंधरा लाखांची वाढ करण्यात आली. महिला व बालकल्याण विभागांतर्गत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पिंक रिक्षा मोहिमेंतर्गत रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सीबीएसई पॅटर्न अभ्यासक्रमाच्या संस्थांना महापालिकेच्या शाळा चालविण्यास दिल्या जाणार आहेत.

युवक, महिला, विद्यार्थी व बेरोजगारांच्या दृष्टीने अंदाजपत्रकात ११ उपक्रमांचा समावेश करण्यात आला. सर्वसमावेशक अंदाजपत्रकातून शहराचा समतोल विकास साध्य करता येईल.
- हिमगौरी आहेर-आडके, सभापती, स्थायी समिती

भाजपचा अकरा कलमी विकास कार्यक्रम
  फाळके स्मारकात फिल्मसिटी
  पंचवटी कारंजा, शिवाजी गार्डनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा
  नाशिक रोडच्या पुतळ्याचे सुशोभीकरण
  द्वारका येथील महापालिकेच्या चार एकर जागेत अटल उद्योगसंकुल
  यूथ इव्हेंटसाठी युवा धोरणात १५ लाखांची अतिरिक्त तरतूद
  महिला सबलीकरणासाठी ‘पिंक रिक्षा’ उपक्रम
  आनंदवली ते तपोवनापर्यंत दशक्रिया विधी सुविधा
  महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न
  टाकळी रोडवरील महापालिकेच्या जागेत डॉ. बाबासाहेब नॉलेज बॅंक भवन
  प्रभाग १२ मध्ये दोन एकर जागेत स्टेडियम कॉम्प्लेक्‍स
  शहराच्या प्रवेशद्वारांवर ‘पीपीपी’ तत्त्वावर स्वागत कमानी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com