'...तर 'ईडी'ला कृष्णकुंजवर येऊन उत्तर द्यावे लागेल'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करताना ''कामे केली असेल तर लोकांना माहीत आहे. त्यासाठी जनादेश यात्रा काढण्याची गरज का वाटली,'' असा सवाल देशपांडे यांनी केला.

नाशिक : डोक्‍यावर बसला नरेंद्र व डोक्‍यात गेलाय देवेंद्र....अशी राज्याची स्थिती झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेच्या निवडणुका लढणार नसल्याचे कधीही विधान केले गेलेले नाही. उलट विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याची तयारी सुरू आहे," असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी येथे केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी देशपांडे यांच्यासह अभिजित पानसे येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ''विधानसभा निवडणुकीसंदर्भात मनसेकडून अद्यापपर्यंत कुठलीच घोषणा झालेली नाही. लोकसभा निवडणूक लढली नसली तरी विधानसभेच्या निवडणूक लढणार नसल्याचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कधीच म्हटले नाही. पक्ष निवडणुकीची तयारी जोमाने करत आहे. निवडणुकीत आघाडीसोबत जाणार, किती उमेदवार उभे करणार, कुठल्या जागांवर लढणार याबाबत राज ठाकरे यांचा निर्णय अंतिम असेल.''

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करताना ''कामे केली असेल तर लोकांना माहीत आहे. त्यासाठी जनादेश यात्रा काढण्याची गरज का वाटली,'' असा सवाल देशपांडे यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. परंतु, वर्षाला एक कोटी नोकऱ्या जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र वगळून सर्व पूरग्रस्त राज्यांना मदत केली, असा आरोपही त्यांनी केला. ईडी कार्यालयाने मराठी पाटी न लावल्याने मनसेकडून नोटीस देण्यात आली आहे. नोटीसला रितसर उत्तर न मिळाल्यास कृष्णकुंजवर येऊन उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS leader Sandip Deshpande talked about ED and Raj Thackeray inquiry