कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्तीसाठी मनसेचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

सटाणा : बागलाण तालुक्याला गेल्या दीड वर्षांपासून कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून अनेक शासकीय कामे रखडली आहेत. शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही शालेय कामकाजासाठी दाखले वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांची मोठी अडचण होत आहे. शासनाने तालुक्यात कायमस्वरूपी तहसीलदाराची नियुक्ती करावी या मागणीसाठी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची कुचंबना होत आहे. तहसीलदार पदावर प्रभारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार नसल्याने तालुक्यातील अनेक शासकीय योजना रेंगाळल्या आहेत. तालुक्यातील विविध पक्ष संघटनांनी वेळोवेळी आंदोलने करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता. मनसेने अनेकवेळा लेखी निवेदने देऊन तहसील कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला होता. लवकरच तहसीलदारांची नियुक्ती होईल असे आश्वासन मनसेला देण्यात आले. मात्र, चार महिने उलटूनही आश्वासनांपलीकडे कोणतीही कार्यवाही होत नसल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. सटाणा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

अखेर काल सोमवार (ता.9) रोजी मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट नाशिक विभागीय महसूल आयुक्तालय गाठत महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांची भेट घेतली आणि कायमस्वरूपी तहसीलदारांच्या नियुक्तीची आग्रही मागणी केली. बागलाणच्या तहसीलदारपदी वंदना खरमाळे यांची नियुक्ती झालेली असताना त्या अद्याप रुजू का होत नाहीत, असा सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी महसूल उपायुक्त स्वामी यांनी दोन दिवसांत कायमस्वरूपी तहसीलदार नेमणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज सोनवणे, तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, शहराध्यक्ष पंकज सोनवणे, वैभव सोनवणे, शहर सरचिटणीस मंगेश भामरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे, मनसे उपशहरअध्यक्ष निलेश नंदाळे, उपशहरअध्यक्ष हेमंत इंगळे, उपतालुकाध्यक्ष विश्वास खैरनार उपस्थित होते.

Web Title: MNS's request for permanent Tehsildar appointment