वादळी पावसात झाडाखाली दबून आईसह तीन चिमुकल्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

बाळापूर - वरखेडी (ता. धुळे) शिवारात रात्री वादळी पावसात घरावर कोसळलेल्या झाडाखाली दबल्याने आईसह तीन चिमुकल्यांचा करूण अंत झाला. 

धुळे - शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी शनिवारी सायंकाळनंतर पावसाने कहर केला. यात मोठ्या प्रमाणावर शेतीसह विविध साधनांचे नुकसान झाले. रात्रभर हा जोर कायम होता. अशा स्थितीत बाळापूर- वरखेडी (ता. धुळे) शिवारात रात्री वादळी पावसात घरावर कोसळलेल्या झाडाखाली दबल्याने आईसह तीन चिमुकल्यांचा करूण अंत झाला. 

वरखेडी येथील गंगामाई हायस्कूलमागे शेत शिवार आहे. तेथे प्रभाकर गुजर यांच्या शेतात चिंचेच्या झाडालगत पत्र्याच्या शेडवजा घरात दादूराम पावरा (वय 32, मूळ रा. खडकी, ता. पानसमेल, जि. बडवानी, मध्य प्रदेश ) व कुटुंबियांचे वास्तव आहे. 

वादळी पावसाचा कहर -
कानठळ्या आणि थरकाप उडविणा-या वीजांच्या कडकडाटामुळे, प्रचंड वादळी वा-यासह पावसामुळे अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यातच रात्री साडेअकरानंतर वीज कोसळून वरखेडीत चौघांचा मृत्यू झाल्याची वार्ता खानदेशात पसरली. 

चौॆघांचा जागीच मृत्यू -
महसूल यंत्रणेकडे वरखेडी- बाळापूर शिवारातील शेतात जुने चिंचेचे झाड घरावर कोसळून महिला व तिच्या तीन मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली. झाड कोसळल्याने घरातील अनिता दादूराम पावरा (28) व मुली वशिला (5), पिंकी (3), रोशनी (2) दबल्या गेल्या. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेत दादूराम पावरा जखमी झाले. ते उपचार घेत आहेत.

दीडशे जणांचे मदतकार्य -
पावसाचा जोर कायमच होता. या स्थितीत  दादूराम पावरा मदत मिळावी म्हणून वरखेडीच्या दिशेने धावले. तेव्हा ग्रामस्थाना ही घटना घडल्याचे कळाले. 

पावसातच काही ग्रामस्थांसह शंभर ते दीडशे तरूण पीडित पावरा कुटुंबाच्या मदतीला धावले. वीज पुरवठा खंडीत असल्याने अनेक अडथळे होते. बॅटरी, दोरखंड, करवत, कुऱ्हाड अशी साधने हाताशी असूनही मदतकर्त्यांना चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी एक ते दीड तास लागला. तोपर्यंत रूग्णवाहिका बोलाविण्यात आली. त्यासह खासगी वाहनाने आईसह तिघा लेकींचे मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे गावासह जिल्ह्यात शोककळा पसरली. 

मोठे नुकसान, सात गुरे ठार -
प्रचंड वादळी वाऱ्यासह पावसामुळे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणचे भाग अंधारात बुडाले. शेतात पाणी साचले. अनेक ठिकाणी वीजेचे खांब वाकले, तारा तुटल्या, बॅनर, जाहीरातीचे फलक कोसळले, वाकले, तात्पुरत्या स्वरूपातील रसवंत्यांचे छत उडाले, झाडे उन्मळून पडली, त्यामुळे काही प्रमुख मार्गांवर वाहतूक ठप्प झाली. जनजीवन विस्कळीत झाले. पहाटे पावसाने विश्रांती घेतली. सकाळी साडेआठनंतर काही भागात वीज पुरवठा सुरळीत झाला. कापडणे (ता. धुळे) येथे सात जनावरे ठार झाली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Mother and her three daughters are died in dhule