पोलिसांच्या विरोधात मुलासाठी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

सिन्नर फाटा नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी केलेल्या काठीहल्ल्यात गंभीर जखमी झालेला माझा मुलगा शुभम याला न्याय मिळत नसून या प्रकरणात पोलिसांनी हात वर केले आहेत. संबंधित पोलिसांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा; अन्यथा आपण आंदोलन छेडणार असल्याचे पूजा महाले यांनी रविवारी (ता. २६) सांगितले.

नाशिक रोड पूर्व - सिन्नर फाटा नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी केलेल्या काठीहल्ल्यात गंभीर जखमी झालेला माझा मुलगा शुभम याला न्याय मिळत नसून या प्रकरणात पोलिसांनी हात वर केले आहेत. संबंधित पोलिसांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा; अन्यथा आपण आंदोलन छेडणार असल्याचे पूजा महाले यांनी रविवारी (ता. २६) सांगितले.

नाशिक-पुणे रोडवरील सिन्नर फाटा पोलिस चौकीसमोर मंगळवारी (ता. २१) सायंकाळी साडेपाचला नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी शुभम महाले (वय २१) यास डोक्‍यावर काठी मारली. मेंदूला तीव्र फटका बसल्याने तो सध्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. प्रकृती गंभीर असणाऱ्या शुभमला आम्ही मारहाण केलीच नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. पूजा महाले यांनी मात्र आपल्या मुलाला पोलिसांनीच मारहाण केली असून, प्रकरण अंगलट येईल म्हणून पोलिस खोटे बोलत आहेत, असा आरोप करीत संताप व्यक्त केला.

मदतीसाठी धावली शिवसेना
पोलिसांच्या दंडुक्‍याने कोमात गेलेल्या दुचाकीस्वाराच्या मदतीसाठी शिवसेना धावून गेली असून, महाले कुटुंबीयांना  सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्‍वासन शिवसेनेचे महानगरप्रमुख महेश बडवे यांनी रविवारी दिले. किमान माणुसकीच्या नात्याने पोलिस प्रशासनाने या युवकाची किमान भेट घेऊन मदतीचा हात देणे गरजेचे होते. विधवा मातेचा आधार असलेला तरुण मुलगा शुभम महाले कुटुंबातील महत्त्वाचा घटक असून, त्याची आई पूजा महाले देवळाली येथे मोलमजुरी (धुणी-भांडी) करून उपजीविका भागविते. हेल्मेटसक्ती कौतुकास्पद असली तरी पोलिसांना घाबरून पळू पाहणाऱ्यांना ज्या प्रकारे पोलिस दंडुक्‍याचा वापर करतात तो निंदनीय आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने त्वरित आरोपीवर कारवाई करून संबंधित घटनेची योग्य चौकशी करून त्या तरुणाला औषधोपचारासाठी मदत करावी, अशी अपेक्षा श्री. बडवे यांनी व्यक्त केली. 

या वेळी शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, शैलेश सूर्यवंशी, नीलेश मोरे, सुदाम दुशिंग, महेंद्र बडवे, अविनाश मोरे, विजय मेंदळे, पोपट शिंदे आदी उपस्थित होते.

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त ईश्‍वर वसावे यांना तपास करून चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यांच्या अहवालानुसार कारवाई केली जाणार आहे. पोलिस यंत्रणेने रुग्णालयाशी संपर्क साधून डॉक्‍टरांना योग्य उपचार 
करण्याची विनंती केली आहे.
- अमोल तांबे, पोलिस उपायुक्त, नाशिक शहर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The movement for the child against the police