
वर्षभराची बिले थकित असलेल्यांनी तातडीने बिल भरणे आवश्यक आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षातर्फे सहकार्याचे आश्वासन दिले.
शिरपूर : आम्हाला थकित वीजबिल वसूल करण्यात रस आहे. वीजजोडणी कापण्यात नव्हे, वायरमन घरी जाऊन तंबी देत नाहीत तोवर कोणीही वीजबिल भरण्यासाठी येत नाही. घरगुती वीज ग्राहकांना अर्धी रक्कम भरून उर्वरित रकमेचे हप्ते बांधून देत आहोत. तुम्ही सहकार्य केले तर आमचे काम अधिक सोपे होईल, अशी कैफियत वीज वितरण कंपनीचे शहर उपअभियंता डी. एम. पाटील यांनी तक्रार घेऊन आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ऐकवली आणि काही क्षण शांतता पसरली.
आवश्यक वाचा- एकाच वेळी १०० उपग्रह अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रम; भुसावळच्या विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग
शहरात महावितरणतर्फे थकित विजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम सुरू आहे. त्यात काही ग्राहकांनी अर्धी रक्कम भरण्याची तयारी दर्शवूनही त्यांची जोडणी कापणे, ५० टक्क्यांहून अधिक बिल भरण्याची सक्ती करणे आदी प्रकार घडत आहेत, अशी तक्रार भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळे गुरुवारी भाजपचे प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, अरुण धोबी, संजय आसापुरे, महेंद्र पाटील, मुबीन शेख आदी क्रांतीनगर येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन धडकले. ग्रामीण विभागाचे उपअभियंता नेमाडे, कनिष्ठ अभियंता बढे, सचिन पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. चौधरी यांनी प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन यांच्याशी संपर्क साधून वीज बिलांच्या समस्येची माहिती दिली.
आवर्जून वाचा- भाजपचा उद्देश खोटा ठरला ! ज्यांनी भूमिपूजन केले त्यांच्याच हस्ते जलपूजन करू
काही वेळानंतर उपअभियंता डी. एम. पाटील कार्यालयात दाखल झाले. बबनराव चौधरी, हेमंत पाटील यांनी त्यांना वीज जोडणी कापणीचे प्रकार तातडीने थांबवा, अन्यथा ग्राहकांचा मोर्चा आणण्याचा इशारा दिला. वाढीव विजबिलांच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली. त्यावर डी. एम. पाटील यांनी सांगितले, की शहरात सुमारे पाच हजार ग्राहक आहेत. जोडणी कापण्यापेक्षा थकित बिलांच्या वसुलीला प्राधान्य दिले आहे. मात्र, जोडणी कापली जाईल, असा इशारा दिल्याशिवाय ग्राहक बिल भरण्यासाठी येत नाहीत. महावितरण सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. मात्र, वर्षभराची बिले थकित असलेल्यांनी तातडीने बिल भरणे आवश्यक आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षातर्फे सहकार्याचे आश्वासन देऊन लॉकडाउनमुळे ग्राहकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने महावितरणने सामंजस्य दाखवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संपादन- भूषण श्रीखंडे