esakal | ‘परिवहन सेवा’, ‘ट्रान्स्पोर्ट हब’चे स्वप्न; धुळे महापालिकेचे ६२२ कोटींचे अंदाजपत्रक सादर 
sakal

बोलून बातमी शोधा

‘परिवहन सेवा’, ‘ट्रान्स्पोर्ट हब’चे स्वप्न; धुळे महापालिकेचे ६२२ कोटींचे अंदाजपत्रक सादर 

शायराना अंदाजात आशावाद पेरत महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी गुरुवारी महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीपुढे सादर केले

‘परिवहन सेवा’, ‘ट्रान्स्पोर्ट हब’चे स्वप्न; धुळे महापालिकेचे ६२२ कोटींचे अंदाजपत्रक सादर 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः ‘रखो हौसला वो मंजर भी आयेगा... प्यासे के पास चलकर समंदर भी आयेगा, थक कर ना बैठो ए मंजिल के मुसाफिर... मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आयेगा...’ अशा शायराना अंदाजात आशावाद पेरत महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी गुरुवारी महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीपुढे सादर केले. एकूण ६२२ कोटी ६६ लाख ७९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकात धुळेकरांना आयुक्त शेख यांनी परिवहन सेवा, ट्रान्स्पोर्ट हब, डेडरगाव तलाव सौंदर्यीकरण आदी नवी स्वप्ने दाखविली आहेत. 

महापालिका प्रशासनाने तयार केलेले महापालिकेचे २०२०-२१ चे सुधारित व २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक आयुक्त शेख यांनी गुरुवारी सकाळी अकराला स्थायी समितीच्या विशेष सभेत सादर केले. नवनिर्वाचित सभापती संजय जाधव यांची तब्येत बरी नसल्याने ते सभेला येऊ शकले नाहीत. त्यामुळे हंगामी सभापती म्हणून माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी काम पाहिले. आयुक्त शेख, नगरसचिव मनोज वाघ, समिती सदस्य, अधिकारी उपस्थित होते. आयुक्त शेख यांनी हंगामी सभापती बैसाणे यांच्याकडे अंदाजपत्रकाची प्रत सुपूर्द केली व अंदाजपत्रकाबाबत मनोगत मांडले. 

परिवहन सेवा 
आयुक्त शेख यांनी हद्दवाढीनंतर विस्तारलेल्या १०१.०८ चौरस किलोमीटर क्षेत्रातील नागरिकांसाठी महापालिकेच्या नियंत्रणाखाली परिवहन सेवेची तरतूद केल्याचे सांगितले. या सेवेचा उपयोग साक्री, मालेगाव, शिरपूर, दोंडाईचा आदी नेहमीच्या संपर्कातील शहरांसोबतही व्हावा, असे नियोजन आहे. 

ट्रान्स्पोर्ट हब 
राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे जाळे असलेल्या धुळे शहरात महापालिका मालकीच्या जागेवर ट्रान्स्पोर्ट हबसाठीही अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, टुव्हीलर, थ्रीव्हीलर, फोरव्हीलर व मालवाहतूक गाड्यांचे शोरूम, सर्व्हिस सेंटर, बॉडीबिल्डिंग, गॅरेज, पार्किंग तसेच नागरिकांसाठी दवाखाने, बँक, इंटरनेट आदी सुविधा या हबमध्ये दिल्यास कोट्यवधींची उलाढाल होऊ शकेल, असा आशावाद श्री. शेख यांनी व्यक्त केला. 
 

अंदाजपत्रकातील तरतुदी 
-डेडरगाव तलाव परिसर सौंदर्यीकरण : २५ लाख 
-विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका : २५ लाख 
-पार्किंग व्यवस्था : १० लाख 
-परिवहन सेवा : ५० लाख 
-ट्रान्स्पोर्ट/इंडस्ट्रिअल हब : ५० लाख 
-मनपा जागा विकसित करणे : ५० लाख 
-ओपनस्पेस विकसित करणे : ५० लाख 
-आर्थिक दुर्बल घटक (राखीव निधी) : ६१ लाख ६२ हजार 
-महिला व बालकल्याण (राखीव निधी) : ६१ लाख ३२ हजार 
-दिव्यांग कल्याण (राखीव निधी) : ६१ लाख ३२ हजार 
-मनपा शाळांसाठी विविध उपक्रम : २५ लाख 
-नवीन मिळकतींचा सर्व्हे : २ कोटी 
-प्रलंबित देयके : १५ कोटी 
-नगरसेवक निधी : १६ कोटी 
-ई-गव्हर्नन्स : १ कोटी 
-एकात्मिक डास निर्मूलन : ४ कोटी 
-एलईडी पथदीप : १० कोटी 

अंदाजपत्रक असे 
२०२०-२१ सुधारित २०२१-२२ मूळ 
-प्रशासन : ६२२ कोटी ६६ लाख ७९ हजार रुपये 

२०२०-२१ चे अंदाजपत्रक असे 
-प्रशासन : ७२७ कोटी ५९ लाख १६ हजार 
-स्थायी समिती : ७६४ कोटी ४ लाख १६ हजार 
-महासभा : ७९१ कोटी ९ लाख १६ हजार 
-अंतिम : ६२१ कोटी ५२ लाख ६३ हजार रुपये  

संपादन- भूषण श्रीखंडे