भाजपचे नाराज संपर्कात!

Jalgav-Corporation
Jalgav-Corporation

जळगाव - महापालिकेच्या महापौर निवडीवेळी गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची मागणी जिल्हाधिकारी, मुख्य निवडणूक आयोगाकडे उद्या (ता.१७) करणार आहोत, असे सांगत महापौरपदी सीमा भोळेंचे नाव जाहीर झाल्याने अनेक भाजप नगरसेवक नाराज असून, ते आपल्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट महापालिकेतील विरोधी पक्षनेते (शिवसेना) सुनील महाजन यांनी केला. 

काल महापौरपदासाठी अर्ज दाखल करतानाही महाजन यांनी शिवसेनेचाच महापौर होईल, असा दावा केला होता. महापौर निवडीसंदर्भात आज शिवसेनेतर्फे महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. त्यात महाजन यांनी ही माहिती दिली. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते.

भाजप नगरसेवक नाराज
घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षात आमदारांच्या घरात अनेक पदे कशी काय चालतात? असा प्रश्‍न सुनील महाजन यांनी उपस्थित केला. शिवाय, सीमा भोळेंना महापौरपदी उमेदवारी दिल्याने भाजप नगरसेवकांनी आमच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे. भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केल्यास येणाऱ्या अडचणींवर कायदेशीर उपाययोजना आम्ही शोधत आहोत. महापालिकेत महापौर, उपमहापौर शिवसेनेचा होईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल.

‘एमआयएम’चे सदस्य सोबत
मेहरूण परिसरातून तीन ‘एमआयएम’चे तीन नगरसेवक निवडून आलेले आहे. तेही विकासासाठी शिवसेनेसोबत असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. 

शहर न सोडण्याचा ‘व्हीप’
शिवसेना भाजप नगरसेवकांच्या संपर्कात असल्याने भाजपने नगरसेवकांना शहर सोडून बाहेरगावी न जाण्याचा ‘व्हीप’ जारी केला आहे. 

खडसे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते
माजी मंत्री, आमदार एकनाथराव खडसे यांना आम्ही भेटलो. ही आमची सदिच्छा भेट होती. कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा आमच्यात झाली नाही. 

श्री. खडसे हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना कोणीही वैयक्तिकरीत्या भेटू शकतो. यामुळे त्यांच्याशी झालेल्या भेटीशी राजकीय अर्थ लावला जायला नको, अशी पुस्तीही महाजन यांनी जोडली. 

महापौर भाजपचाच होणार - एकनाथराव खडसे
महापौर, उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्यानंतर सुनील महाजन यांनी या निवडीत जादू होऊन महापौर शिवसेनेचाच होईल, असे भाकीत वर्तवून आपण एकनाथराव खडसेंची भेट घेतल्याचे सांगितले. मात्र, खडसेंनी महाजनांचा दावा खोडून काढत भाजपचाच महापौर होईल, असे स्पष्ट केले आहे. महाजन यांनी भेट घेतली. मात्र, त्यात यासंदर्भात चर्चाच झाली नाही. ती केवळ व्यक्तिगत भेट होती. शिवसेना दिशाभूल करीत आहे, असेही खडसेंनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com