विकासाच्या नावाखाली मनपाकडून `चॉकलेट`! सभापतीसमोर व्यक्त केला नागरिकांनी रोष 

निखील सुर्यवंशी
Tuesday, 5 January 2021

दोन वर्षे उलटूनही रस्त्यावरील खड्डे आहे तसेच आहेत. वलवाडी ग्रामपंचायतीच्या इमारतीतच महापालिका कर भरण्याची सुविधा करावी.

धुळे ः महापालिकेची हद्दवाढ करताना समाविष्ट गावांना अधिकाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली फक्त `चॉकलेट` दिल्याचे स्पष्ट होत आहे. पंतप्रधानांनी वलवाडीला दत्तक घेतले तरी अपेक्षित समस्या सुटू शकत नाहीत कारण महापालिकेची नेमकी स्थिती काय आहे? हे सर्वश्रुत असल्याचे टीकास्त्र वलवाडीकरांनी सोमवारी (ता. ४) सोडले. तरीही सभापती आपल्या दारी या मोहिमेंतर्गत काही नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचा स्थायी समिती सभापतींनी जागीच निपटारा केला. 
 

आवश्य वाचा-  अविश्वासाचा ठराव घ्यायला गेले आणि झाले उलटे; मग काय भाजपचे नगरसेवक पडले तोंडघशी ! 
 

महापालिका क्षेत्रात सभापती आपल्या दारी या मोहिमेचा वलवाडी येथील प्रभाग क्रमांक एक आणि दोनमधून शुभारंभ झाला. त्यासाठी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी पुढाकार घेतला. नगरसेवक नरेश चौधरी, नगरसेविका वंदना भामरे, प्रतिभा चौधरी, भारती माळी, नगरसेवक नंदू सोनार, बंटी मासुळे, भगवान गवळी, रंगनाथ ठाकरे, दगडू बागूल, पुष्पा बोरसे, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, साहाय्यक आयुक्त विनायक कोते, शहर अभियंता कैलास शिंदे, अभियंता पी. डी. चव्हाण, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. योगेश पाटील, विद्युत विभाग अभियंता एन. के. बागूल, आरोग्य विभागाचे लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव, स्वच्छता निरीक्षक, कमलेश सोनवणे, निखिल टकले, पराग ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते गोपीचंद पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते. 

 
तक्रारींचा पाढा, मागण्या 

वलवाडीसह वाडीभोकरच्या रहिवाशांनी सभापती, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. पंचायत समितीचे माजी सदस्य छोटू चौधरी म्हणाले, की वलवाडी गाव महापालिका हद्दीत समाविष्ट होताना अधिकाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली चॉकलेट दिले. दोन वर्षे उलटूनही रस्त्यावरील खड्डे आहे तसेच आहेत. वलवाडी ग्रामपंचायतीच्या इमारतीतच महापालिका कर भरण्याची सुविधा करावी. वलवाडी, भोकर येथे क्षतीग्रस्त रस्त्यांवर मुरूम टाकणे, सुशोभीकरण, घंटागाडी नियमितपणे पाठविणे, मोकळ्या भूखंडांवरील झाडेझुडपे काढणे, स्मशानभूमीस संरक्षण भिंत, जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्रासाठी संरक्षक भिंत करणे, गरजूंना रमाई आवास योजनेचा लाभ, बखळ जागेवरील कर कमी करणे, गावठाणाबाबत ८ क्रमांकाचा उतारा देणे, शौचालयांची दुरुस्ती, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मनपा कायम सेवेत सामावणे आदी मागण्या रहिवाशांनी केल्या. त्यावर जलद कार्यवाहीची सूचना सभापतींनी यंत्रणेला दिली. 

आवर्जून वाचा- गांजा माफियांची अजब युक्ती; गाडीवर चक्क महाराष्ट्र शासनाचे स्टिकर लावून तस्करी 

समस्या जाणण्यासाठी घरोघरी 
सभापती बैसाणे यांनी प्रभाग एक व दोनमध्ये घरोघरी भेट देत नागरी समस्या जाणल्या. यात अनेक तक्रारींचा जागीच निपटारा केला. परिसरात फवारणीसह स्वच्छतेवर भर देण्यात आला. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation marathi news dhule citizens angry problems standing committee chairman