अभय योजनेमुळे धुळे महापालिकेच्या तिजोरीत साडेसहा कोटी रुपयांची भर 

अभय योजनेमुळे धुळे महापालिकेच्या तिजोरीत साडेसहा कोटी रुपयांची भर 

धुळे : मालमत्ता कर थकबाकीवरील शास्ती (दंड) माफीसाठी महापालिकेने अभय योजना सुरू केल्यानंतर या योजनेच्या पहिल्या टप्प्याअंती महापालिकेच्या तिजोरीत साडेसहा कोटींची भर पडली, तर सवलतीमुळे अडीच कोटीवर महापालिकेला पाणी सोडावे लागले. अर्थात, या योजनेमुळे थकबाकीदारांना फायदा होत आहे, तर महापालिकेला फायद्यासह तोटाही सहन करावा लागत आहे. दरम्यान, या योजनेमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत करवसुलीत साधारण चार-साडेचार कोटींची पिछाडी होती, ती भरून काढण्यासही मदत झाली आहे. 

कोरोनाच्या संकटाने सर्वच नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागली आहे. त्यामुळे विविध शासकीय संस्थांच्या करवसुलीवरही परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर नागरिकांनाही दिलासा देता यावा व करवसुलीदेखील व्हावी, या उद्देशाने महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीवरील शास्ती (दंड) वर सूट देण्यासाठी नववर्षापासून (ता.१) अभय योजना सुरू केली. या योजनेंतर्गत १ ते १५ जानेवारीदरम्यान शास्तीवर १०० टक्के, तर १६ ते ३१ जानेवारीदरम्यान शास्तीवर ५० टक्के सूट दिली आहे. या योजनेचा फायदा घेत थकबाकीदारांनी पंधरा दिवसांत चांगला प्रतिसाद दिला. लाभासह कर भरण्यासाठी महापालिकेत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

थकदार, महापालिकेचा फायदा

अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात अर्थात, १ ते १५ जानेवारीदरम्यान मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या तिजोरीत एकूण सहा कोटी ५१ लाख ९१ हजार ४१० रुपये जमा केले. त्यामुळे जसा थकबाकीदारांचा फायदा झाला तसा एका अर्थाने महापालिकेचाही फायदाच झाला. न होणारी करवसुली या योजनेमुळे करता आली. अभय योजनेच्या पहिल्या पंधरा दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत साडेसहा कोटींवर भर पडली. पंधरा दिवसांत ज्या थकबाकीदारांना सूट दिली गेली त्याची रक्कम तब्बल दोन कोटी ५३ लाख ९५ हजार ५०८ रुपये एवढी आहे. अर्थात सूट दिली नसती तर महापालिकेच्या तिजोरीत एकूण नऊ कोटी पाच लाख ८६ हजार ९१८ रुपये जमा झाले असते. 

ऑनलाइन पेमेंटलाही पसंती 
अभय योजनेच्या पहिल्या पंधरा दिवसांत एकूण सात हजार ६४९ मालमत्ताधारकांनी कर अदा केला. यात साडेचार हजार मालमत्ताधारकांनी कॅशने कर अदा केला, तर एक हजार ३४५ जणांनी धनादेश दिले. तसेच सध्या अनेक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने व महापालिकेनेदेखील ऑनलाइन कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने या ऑनलाइन प्रणालीचाही एक हजार ८०४ जणांनी उपयोग करून कर अदा केला. यात एक कोटी ३० लाख ७३ हजार ५६७ रुपये मनपा तिजोरीत ऑनलाइन जमा झाले, तर डिस्काऊंटसह एकूण एक कोटी ७३ लाख ५७ हजार ११० रुपयांचा ऑनलाइन व्यवहार झाला.  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com