धुळे महापालिकेला स्कॉच ॲवॉर्ड; भुयारी गटार स्वच्छतेसाठी रोबोटिक मशिनचा वापर 

निखील सुर्यवंशी
Thursday, 24 December 2020

ॲवॉर्डसाठी २० टक्‍के नागरिकांचे अभिप्राय व ८० टक्के परीक्षकांचे अभिप्राय असे गुणांचे विभाजन केले होते. या स्पर्धेत देशभरातील एक हजारापेक्षा जास्त महापालिका, नगर परिषदांनी सहभाग घेतला होता.

धुळे ः स्वच्छता व आनुषंगिक कामांसाठी अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर करण्याच्या अनुषंगाने स्कॉच संस्थेने घेतलेल्या स्कॉच ॲवॉर्ड स्पर्धेत धुळे महापालिकेला रजतपदक प्राप्त झाले. महापालिकेने शहरातील भूमिगत गटारी साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या रोबोटिक मशिनच्या (बॅंडिकूट) संदर्भाने स्पर्धेत सहभाग घेतला होता. 

आवश्य वाचा- धुळे जिल्ह्यात ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू !

स्वच्छता व आनुषंगिक कामांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अनुषंगाने स्कॉच संस्थेतर्फे देशभरातील महापालिका, पालिका व जिल्हा प्रशासनासाठी संयुक्‍त स्पर्धा घेतली होती. स्कॉच ॲवॉर्डसाठी ७ नोव्हेंबरला धुळे महापालिकेने सहभाग नोंदवून नामांकन प्राप्त केले होते. इनोव्हेशन ॲन्ड टेक्नॉलॉजी या कॅटेगरीत सहभाग नोंदविला होता. २२ डिसेंबरला ६९ वी स्कॉच समीट झाली. ॲवॉर्डसाठी २० टक्‍के नागरिकांचे अभिप्राय व ८० टक्के परीक्षकांचे अभिप्राय असे गुणांचे विभाजन केले होते. या स्पर्धेत देशभरातील एक हजारापेक्षा जास्त महापालिका, नगर परिषदांनी सहभाग घेतला होता.

कामाची घेतली दखल

यात धुळे महापालिकेतर्फे आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंडिकूटच्या माध्यमातून केलेल्या कामाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गौरव करण्यात आला व धुळे महापालिकेस रजतपदक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. या स्पर्धेसाठी आयुक्त शेख यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्‍त शांताराम गोसावी, सहाय्यक आयुक्त विनायक कोते, सहाय्यक सार्वजनिक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव, प्रकल्प अधिकारी (एआयआयएलएसजी) शरयू सनेर, श्रीनाथ देशपांडे, शहर समन्वयक जुनेद अन्सारी आदींनी परिश्रम घेतले.  
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation marathi news dhule scotch award cleaning robotic machines