
भुयारी गटार योजनेमुळे रस्त्यांप्रश्नी होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने मंत्रालयस्तरावर तसेच एमजेपीकडेही विषयाच्या अनुषंगाने इतिवृत्त पाठविण्याची कार्यवाही केली जाईल
धुळे ः भुयारी गटार योजनेअंतर्गत खोदलेल्या शहरातील देवपूर भागातील रस्त्यांप्रश्नी वारंवार तक्रारी, यासंदर्भात सूचना, आदेश देऊनही काहीही उपयोग होत नसल्याचे दिसते. त्यामुळे संबंधित नगरसेवक स्वतःच तक्रार का होत नाहीत, असे म्हणत याप्रश्नी तक्रार करा व ‘एमजेपी‘च्या अधिकाऱ्यांना आरोपी करा, अशी सूचना खुद्द स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी आज महापालिकेत स्थायी सदस्यांनी केली. रस्त्यांची दुरवस्था जाणून घेण्यासाठी ठेकेदाला मोटरसायकलवर पाहणी करायला लावू, असा पर्याय समोर आला.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा झाली यात सभापती सुनील बैसाणे, उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. सभेत सदस्य भारती माळी यांनी भुयारी गटार योजनेच्या गलथान कामांमुळे नागरिकांचे अपघात होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अशा घटनांमुळे कुणाच्या जिवाचे बरेवाईट झाले तर कोण जबाबदार राहील, असा प्रश्नही त्यांनी केला.
एमजेपीचे नियंत्रण नाही
श्रीमती माळी यांनी रस्त्यांचा प्रश्न मांडल्यानंतर सभापती बैसाणेही संतप्त झाले व ठेकेदारावर एमजेपीचे नियंत्रण नाही, वारंवार सांगूनही काही उपयोग होत नसेल तर तुम्ही स्वतः तक्रारदार व्हा, एमजेपीच्या अधिकाऱ्यांना आरोपी करा, असे सदस्यांना सुचविले.
मोटरसायकलवर फिरवा
देवपूरमधील रस्तेप्रश्नी प्रचंड तक्रारी आहेत. या भागात पायी जाणे मुश्कील झाले आहे. ठेकेदाराला २५ ते २६ वेळा पत्रव्यवहार केला गेला. आता रस्त्यांची नेमकी स्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी ठेकेदार, एमजेपीच्या अधिकाऱ्यांना मोटरसायकलवर फिरायला लावू, असे अभियंता शिंदे यांनी सांगितले. त्यावर सभापती बैसाणे यांनीही मोटरसायकलवर पाहणीच्या पर्यायाला होकार दर्शविला.
मंत्रालयस्तरावर माहिती पाठवा
भुयारी गटार योजनेमुळे रस्त्यांप्रश्नी होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने मंत्रालयस्तरावर तसेच एमजेपीकडेही विषयाच्या अनुषंगाने इतिवृत्त पाठविण्याची कार्यवाही केली जाईल, असेही सभापती बैसाणे म्हणाले.
हिना पठाण संतप्त
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपण साहाय्यक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव यांना फोन केला असता ते आपल्याशी अत्यंत वाईट पद्धतीने बोलल्याची तक्रार सदस्या हिना पठाण यांनी केली. याप्रश्नी त्या संतप्त झाल्या होत्या, त्यांना कशिश उदासी व इतरांनीही साथ देण्याचा प्रयत्न केला. याप्रश्नी दोन दिवसात चौकशीचा आदेश सभापती बैसाणे यांनी उपायुक्त गोसावी यांना दिला. अहवालानंतर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.
‘ते‘ तर गणपती बुडवून बसलेत
सभापतिपदावरून आपल्याला निरोप देण्यासाठी काही जणांना फारच घाई झाली आहे. काही जण तर पाण्यात गणपती बुडवून बसले आहेत, असे सभापती बैसाणे म्हणाले. मात्र, सभापती असलो- नसलो तरी स्थायी समितीत सदस्य आहे, नगरसेवक म्हणूनही आहेच त्यामुळे काम करत राहीन, असा टोला श्री. बैसाणे यांनी संबंधित विरोधकांना लगावला.
संपादन- भूषण श्रीखंडे